विशेष लेखः- रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची प्रथम पसंती ‘आयटीआय’

 




प्रत्यक्ष रोजगार मिळण्याची हमी किंवा स्वयंरोजगार सुरु करण्यास चालना असल्याने विविध व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यास विद्यार्थी वर्गाची प्रथम पसंती असल्याचे दिसून आले आहे. अकोला येथे आयटीआय मध्ये २३ व्यवसायांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठी ८४८ जागा उपलब्ध आहेत.

राज्यातील सर्व आय.टी.आय.मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने राज्यात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या प्रवेश अर्ज निश्चिती सुरू असून राज्यात आतापर्यंत सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चिती केली आहे. आय.टी.आय.कडे विद्यार्थ्यांचा विशेष कल असून, पहिली पसंती विद्यार्थ्यांनी दर्शवली आहे.

राज्यभरात आयटीआय

राज्यात एकूण ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत त्यात वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष आहे. त्यात राज्यात एकूण ५५३ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, प्रवेश क्षमता ५५ हजार आहे. त्यात आदिवासींसाठी ६१ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुलांसाठी मुला मुलींसाठी ४ उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच ४३ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी राज्यात १५ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तर २८ आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नक्षलग्रस्त भागातील युवकांसाठी दोन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आले आहे.

अकोल्यातही उत्तम प्रतिसाद

          शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे एकूण २३ व्यवसायांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत त्यात एक वर्ष मुदतीचे ९ व्यवसाय दोन वर्ष मुदतीचे १४ व्यवसाय असून त्यात ६ व्यवसायात अल्पसंख्याकांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. संस्थेत एकूण प्रवेशासाठी ८४८ जागा उपलब्ध आहेत .आतापर्यंत २५०० प्रवेश अर्ज निश्चित झाले आहेत. मागील दोन वर्षात संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास ३५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. प्राचार्य पी.एन.जयस्वाल हे सध्या संस्थेची धुरा सांभाळत आहेत.

नाविन्यपूर्ण प्रशिक्षणांचा समावेश

           कमीत कमी वेळेत आणि त्वरित रोजगार मिळवून देण्यात आय.टी.आय.च्या प्रशिक्षणाकडे पाहिले जाते. कोविडच्या भयंकर परिस्थितीतून बाहेर पडत असताना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी आय.टी.आय.ने विशेष भूमिका निभावली आहे.नुकतेच वर्षभरापूर्वी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात कायमस्वरूपी संचालक पदाचा कार्यभार डी ए दळवी यांनी स्वीकारला आहे. संचालकांनी खाते अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय व खाजगी आय.टी.आय. मधील प्रशिक्षणाचा दर्जा वाढीसाठी काही धोरणात्मक व ठोस निर्णय घेतले असून.नाविन्यपूर्ण प्रशिक्षण योजनांना प्रोत्साहन देऊन राज्यभरातील आय.टी.आय. मध्ये राबविण्याचा निर्णय घेतला.

ऑनजॉब ट्रेनिंगची सुविधा

        यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग(O.J.T.)योजना राज्यातील आय.टी.आय. मध्ये प्रभावीपणे राबविली जात असून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कारखान्यात तथा उद्योग आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव येतो. कर्मचारी प्रशिक्षण योजना यामध्ये राज्यातील आय.टी.आय च्या निदेशकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून त्याबाबत प्रशिक्षणाची सोय राज्यातील विविध खाजगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये जसे L&T चे पनवेल स्थित प्रशिक्षण केंद्र. औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल्स प्रायव्हेट लिमिटेड ,नाशिक स्थित हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे करण्यात आली. तसेच राज्यातील कर्मचारी अधिकारी यांचे प्रशिक्षण प्रबोधिनींमध्ये यशदा-पुणे, मराठवाडा प्रबोधिनी-औरंगाबाद,वनामती- प्रबोधिनी नागपूर, प्रबोधिनी- अमरावती,प्रशासकीय प्रबोधिनी- नाशिक येथे प्रशिक्षणाची व्यवस्था करून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता तथा दर्जा वाढीकडे विशेष लक्ष दिले आहे.

निदेशकांचेही कौशल्य वर्धन

           राज्यातील निदेशकांचे कौशल्य स्पर्धांचे आयोजन तसेच प्रशिक्षणार्थ्यांसाठी राज्यात कौशल्य स्पर्धांचे आयोजन, तंत्र प्रदर्शने आयोजित करून प्रशिक्षणार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी व निदेशकांच्या विशेष कौशल्य गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘फॅशन शो’सारख्या स्पर्धांचे आयोजन करून कलागुणांसह कौशल्यांचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी व उत्साह वाढीसाठी विशेष प्रयत्न होत आहेत.

व्यवसाय शिक्षणाला विद्यार्थ्यांची पसंती

कर्मचाऱ्यांच्या उत्साहामुळे राज्यातील आय.टी.आय. कडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे.आणि अगदी अल्पावधीतच राज्यातील आय.टी.आय.ला प्रवेशासाठी पहिली पसंती  विद्यार्थी देत आहेत.राज्यात आतापर्यंत जास्त प्रमाणात प्रवेश अर्ज निश्चित झाले असून प्रवेश अर्ज निश्चिती सुरू आहे.यावरून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे असे दिसून आले आहे.

ऑनलाईन प्रवेश

       सध्या राज्यभरातील आय.टी.आय. मध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश निश्चिती सुरू असून सुट्टीच्या दिवशी देखील प्रवेश निश्चिती सुरू आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे व निश्चिती करण्यासाठी 

www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला  जरूर भेट द्या.

-शंतनू वानखेडे, शिल्प निदेशक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ