राष्ट्रीय लोकअदालत दि.१३ ऑगस्ट रोजी


अकोला, दि.१५(जिमाका)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य  विधी सेवा, मुंबई यांच्या सुचनेनुसार दि. १३ ऑगस्ट रोजी अकोला  जिल्हा न्यायालय व सर्व तालुका  न्यायालयामध्ये प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन राष्ट्रीय   लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, लोक न्यायालयामध्ये जी प्रकरणे निकाली निघतात त्यातील   पक्षकारांना खालील प्रमाणे फायदे होतात.

लोकन्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील नाही. एकाच निर्णयात  कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने  ना कोणाचा जय होतो ना कुणाची हार. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल  होत असल्याने एकमेकातील व्दे वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही.  कोर्टाच्या  हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा यांची  बचत होते.,  लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या  प्रकरणांमध्ये  कायद्यानुसार  कोर्ट फी ची  रक्कम परत मिळते.

                          जिल्ह्यातील  ज्या पक्षकारांचे प्रलंबित किंवा  खटलापुर्व  प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत त्यांनी आपली प्रलंबित  व दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक  अदालतीत सुनावणीसाठी ठेवण्यासाठी  संबंधित  न्यायालय, तालुका  विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांच्याशी (०७२४-२४१०१४५) किंवा (८५९१९०३९३०) या क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाईन  तसेच प्रत्यक्ष  राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुवर्णा केवले व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ