जिल्ह्यात स्टार्ट अप संस्कृती विकसित करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा





अकोला दि.11(जिमाका)-  जिल्ह्यात स्टार्टअप संस्कृती विकसित होण्यासाठी  नाविन्यतेस चालना देणे आवश्यक आहे. याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालयामध्ये उद्योजकतेवर कार्यशाळा आयोजित करावी. तसेच उद्योजकता कक्षाची स्थापना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नयन सिन्हा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे आदि उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, जिल्ह्यातील स्टार्टअपची यादी प्राप्त करुन शासकीय खरेदी प्रक्रीयेत त्यांचा समावेश कसा होईल यासाठी  नियोजन करावे.  तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी  शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन जास्तीत जास्त उमेदवारांना जिल्ह्यातील नामांकीत कंपनीच्या आस्थापनेवर भरती मेळावे राबवावे. याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घेऊन उद्योजकता विकास कार्यक्रमाची आखणी करावी. समितीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व  नाविन्यता  विषयक कार्य करणे अपेक्षित असून  जिल्ह्यातील सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक सहकार्य करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या शासन निर्णयानुसार  जिल्ह्यात नाविन्यतेस चालना देण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष असून समितीच्या इतर सदस्यात मनपा आयुक्त, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा कामगार अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा नियोजन अधिकारी, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांचेकडे  सदस्य सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ