प्रधानमंत्री मातृवंदना योजना; सुकाणू संनियंत्रण समितीची बैठक: ५२ हजार लाभार्थ्यांना २० कोटी ९२ लक्ष रुपयांचा लाभ वितरीत

 





अकोला, दि.१४(जिमाका)- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत (सन २०१७ ते जुलै २०२२) ५२ हजार २७ लाभार्थ्यांना  एकूण २० कोटी ९२ लक्ष ५६ हजार रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सुकाणू संनियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली. या योजनेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुकाणू संनियंत्रण समितीची बैठक आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे नोडल अधिकारी डॉ.विजय चव्हाण, समन्वयक आशा ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुर्तिजापूर डॉ. सुधीर कराळे, वैद्यकीय अधीक्षक  डॉ.विलास सोनोने, तालुका आरोग्य अधिकारी अकोला डॉ.जगदीश बनसोडे,  अकोट डॉ.श्वेता सातफोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा गाडगे, डॉ.हर्षल चांडक, मनपाचे डॉ.अनुप चौधरी आदी उपस्थित होते.

सन २०१७ ते जुलै २०२२ पर्यंत या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५२ हजार २७ मातांनी लाभ घेतला आहे. त्याअंतर्गत या सर्व लाभार्थ्यांना एकूण २० कोटी ९२ लक्ष ५६ हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या ९४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. यावेळी माहिती देण्यात आली की, या योजनेचा लाभ हा तीन हप्त्यात देण्यात येतो.

योजनेचे स्वरुपः गरोदर मातांमध्ये कुपोषण व रक्ताल्पता असल्यास  बाळाच्या जन्मावर व वाढीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गरोदरपणात मातेला उत्कृष्ट आहार घेता यावा व तिला कष्टाची कामे करावी लागू नये, यासाठी ही योजना आहे.  दि.१ जानेवारी २०१७ पासून ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ थेट मातेच्या खात्यात जमा केला जातो. या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत  अतिरिक्त लाभही दिला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  गरोदरपणाची नोंद अंगणवाडी केंद्र वा मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेत करावी. त्यावेळी प्रथम हप्ता एक हजार रुपये, सहा महिन्यानंतर दोन हजार रुपये व दोन हजार रुपये बाळाच्या जन्माची नोंद झाल्यावर व लसीकरण झाल्यानंतर दिला जातो. यासोबत जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळाल्यास सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे कार्य जिल्ह्यात उत्कृष्ट असले तरी या योजनेची माहिती अधिकाधिक मातांपर्यंत पोहोचवून त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी गाव पातळीवरील यंत्रणेने प्रयत्न करावे,असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. विजय चव्हाण व डॉ. जगदीश बनसोडे यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ