व्हीआरडीएल लॅबः दिल्लीकडून आजच मान्यता प्राप्त; आता पुढची पायरी गुणवत्ता चाचणीची
अकोला,दि.८ (जिमाका)- कोरोना विषाणू चाचणीसाठी
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब)
उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आता नमुने तपासणी साठी सज्ज आहे. यासंदर्भात या प्रयोगशाळेला मंजूरी मिळावी याबाबतचा अहवाल
आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेकडे दि.७
(मंगळवार) रोजी पाठविण्यात आला होता. त्या अहवालास आजच मान्यता मिळाली आहे.
आता यानंतर लगेचच गुणवत्ता चाचणी ची प्रक्रिया पार करावी लागेल, त्यानंतरच प्रत्यक्ष
चाचणीची परवानगी मिळेल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ.
डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, या प्रयोगशाळेची निर्मिती ही
केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटूंबकल्याण विभाग योजने अंतर्गत विषाणू संशोधन व
निदान प्रयोगशाळा वैद्यकीय
महाविद्यालयस्तरावर स्थापन करण्यात येत आहेत.
त्याअंतर्गत महाराष्ट्रात सहा ठिकाणी या प्रयोगशाळा उभारण्यात येत
असून त्यातील एक अकोला येथील शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येत आहे.
अकोला येथील प्रयोगशाळेसाठी शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत २०० चौरस मिटर जागा देण्यात आली आहे. या
इमारतीचे बांधकाम हे जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे.आय.सी.एम.आर या संस्थेतर्फे
या प्रयोगशाळा उभारणीसाठी ५० लक्ष रुपये
बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी तसेच ९३ लक्ष रुपये यंत्रसामुग्री, आवश्यक रसायने, किट्स, उपकरणे व
फर्निचर यासाठी मंजूर करण्यात आले. या प्रयोगशाळेत बायोसेफ्टी कॅबिनेट, लॅमिनर एअर फ़्लो, ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगर, डीप फ्रिजर इ. आवश्यक
साहित्यही प्राप्त होऊन बसविण्यात आले आहे.
कोरोना विषाणू चाचणीच्या अनुषंगाने आवश्यक असलेले आरटीपीसीआर हे मशिन आयसीएमआर
या संस्थेतर्फे मार्च महिन्यात २४ तारखेला
प्राप्त झाले आहे. प्रयोग शाळेचे आवश्यक काम दि.३० मार्चला पूर्ण झाले आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारे अनुषंगिक यंत्रे,
उपकरणे, रसायने इ. प्राप्त झाली आहेत. आता ही प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सज्ज
आहे.
या प्रयोगशाळेसाठी आवश्यक सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक,
दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे
प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. याशिवाय प्रयोगशाळेत कामासाठी आवश्यक रिसर्च सायंटिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही
पदेही नव्याने भरती करण्यात आली आहेत.
प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही टप्पे पुर्ण करावे लागणार आहेत.
त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रयोगशाळेला मान्यता मिळवणे याबाबतचा अहवाल
आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेकडे दि.७
(मंगळवार) रोजी पाठविण्यात आला. त्या अहवालाला मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आवश्यक प्रायमर, प्रोबस, किट्स
पाठविण्यात येतील. त्यानंतर प्रयोगशाळेची गुणवत्ता चाचणी होईल. गुणवत्ता चाचणीच्या
मानकाद्वारे गुणवत्ता सिद्ध झाल्यास लगेचच या प्रयोगशाळेस विषाणू चाचणीची परवानगी
मिळेल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे
यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा