केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य १ मे पासूनच- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती

अकोला,दि.१५(जिमाका)- देशा सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये यासाठी दि. ३ मे पर्यंत लॉकडाऊन असून संचारबंदी लागु करण्यात आली आहेअशा परिस्थितीत कुणीही व्यक्ती अन्नधान्यापासुन वंचित राहु नये यासाठी सर्व केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यात  स्वस्तदरात धान्य देण्यात येणार आहे.  याबाबत नागरिकांनी समाजमाध्यमांमधून येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या रेशनकार्डधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच अंत्योदय अन्न योजना व शेतकरी लाभार्थी या योजनांचा लाभ मिळत नाही अशा सर्व केशरी रेशन कार्डधारकांना तसेच प्राधान्य कुटुंब गटकिंवा  अंत्योदय अन्न व शेतकरी योजनेत समावेश नसलेल्यांना मे व जून महिन्यात  धान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रति व्यक्ति पाच किलो धान्यतीन किलो गहू(प्रति किलो दर आठ रुपये) दोन किलो  तांदुळ १२ रुपये प्रति किलो दराने  १ मे पासून सर्व  रास्तभाव दुकानांमधुन वितरीत करण्यात येतील. याबाबत नागरिकांनी कोणत्याही समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता दि.१ मे पासून धान्याचा लाभ घ्यावा व वारंवार कार्यालयात तसेच रास्तभाव दुकानांमध्येही गर्दी  करु नये. धान्य घेतांनाही सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी केले आहे.
अन्नधान्याचे नियतन प्राप्त
त्याच प्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत  अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त  प्रति माह पाच किलो तांदूळ मोफत वितरीत करण्याचेही आदेश आहेत.  या योजनेचा लाभ  एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने देण्यासाठी अन्नधान्याचे नियतन जिल्ह्याला प्राप्त झाले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात अशा एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या एक लाख ४० हजार ४४४ असून  त्यावरील सदस्य संख्या  सहा लाख ५ हजार ४५४ इतकी आहे. या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभ देण्यात येत नाही. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन स्थितीमुळे  त्यांना मे व जून या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने धान्य देण्यात येणार आहे.
यासंदर्भात शासनाकडून प्राप्त निर्देश याप्रमाणे-
 या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ति पाच किलो धान्य याप्रमाणेः तीन किलो गहू(प्रति किलो दर आठ रुपये) दोन किलो  तांदुळ १२ रुपये प्रति किलो मे व जून महिन्यात उपलब्ध करुन दिले जाईल. या अशा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसल्यास वा शिधापत्रिकांची नोंद संगणक प्रणालीवर झाली नसली तरीही त्यांना ठरवून दिलेल्या दराने व प्रमाणात धान्य देण्यात येईल. अशा शिधापत्रिकांची नोंद स्वस्त धान्य दुकानदाराने स्वतंत्र नोंदवहीत घ्यावी व सर्व तपशिल नोंदवावा.  कार्डधारकांची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताचा अंगठा घ्यावा व ग्राहकास रितसर पावती द्यावी. हे अन्नधान्य १ मे पासून स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असेल.
असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.
स्वस्त धान्य दुकानांतून दिले जाणारे धान्याचे व वस्तूंचे प्रति व्यक्ती प्रमाण व दर याप्रमाणे-
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना गहू- प्रति व्यक्ती तीन किलो (दोन रुपये प्रतिकिलो)
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना तांदूळ- प्रति व्यक्ती दोन किलो (तीन रुपये प्रतिकिलो)
अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो प्रति शिधापत्रिका (दोन रुपये प्रतिकिलो)
एपीएल शेतकरी  कुटूंबलाभार्थ्यांसाठी गहू-  प्रति व्यक्ती चार किलो (दोन रुपये प्रतिकिलो)
एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांसाठी तांदूळ- प्रति व्यक्ती एक किलो (तीन रुपये प्रतिकिलो)
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  प्राधान्य गटासाठी तांदूळ- प्रतिव्यक्ती  पाच किलो(मोफत)
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंत्योदय  योजना तांदूळ- प्रति सदस्य पाच किलो (मोफत)
शेतकरी योजना एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीमाहे मे मधील गहू- प्रति व्यक्ती तीन किलो (आठ रुपये प्रतिकिलो)
शेतकरी योजना एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीमाहे मे मधील तांदूळ- प्रति व्यक्ती दोन किलो (बारा रुपये प्रतिकिलो)
अन्नपूर्णा योजना- प्रति कार्ड पाच किलो(गहू व तांदूळ) (मोफत)
नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांसाठी- प्रति शिधापत्रिका एक किलो (वीस रुपये प्रतिकिलो) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ