बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांच्या तपासणीचे नियोजन करा-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश


अकोला,दि.३०(जिमाका)- कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन कालावधीत अन्यत्र अडकलेल्या लोकांना आता त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्याबाबत दिशानिर्देश आले आहेत. तथापि, हे लोक आपापल्या गावी परतल्यानंतर त्यांच्या पोहोचण्याची, आरोग्य तपासणी, अलगीकरण आदी व्यवस्थांचे परिपूर्ण नियोजन करा, असे निर्देश राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात आज कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी घेतला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई  भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. गोपिकिशन बाजोरिया,आ. गोवर्धन शर्मा, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे,  राज्य उत्पादन शुक्ल अधिक्षक स्नेहा सराफ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात १८२ पथकांच्या द्वारे १७ हजार ८८४ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात ५१ ठिकाणी फिव्हर क्लिनिक तयार करण्यात आले असून त्यात आजतागायत ९६८५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या गरोदर महिलांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वतंत्र  प्रसुती वार्ड तयार करण्यात आल्याची खबरदारी घेण्यात आली आहे, अशी ही माहिती देण्यात आली.
यावेळी ना. कडू म्हणाले की, जिल्ह्यात आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबई पुणे वा देशातील अन्य भागात अडकलेले लोक येण्याची सुरुवात होईल. हे लोक येण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने परिपूर्ण तयारी करावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ