चार लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत खरीपाच्या नियोजनास मान्यता


अकोला,दि.३०(जिमाका)- जिल्ह्यात एकूण चार लाख ८२ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.  त्यात सर्वाधिक  क्षेत्रावर कापूस व सोयाबीन  प्रत्येकी एक लाख ६० हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. तसेच बियाणे उपलब्धता, खते, किटकनाशके यांच्या आवंटनांची उपलब्धता याबाबतच्या नियोजनासाह खरीप हंगाम २०२०चे नियोजनास आज राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली.
जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शारीरिक अंतर राखत ही सभा पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई  भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. गोपिकिशन बाजोरिया,आ. गोवर्धन शर्मा, आ. नितीन देशमुख, आ. रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे,  राज्य उत्पादन शुक्ल अधिक्षक स्नेहा सराफ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चार लाख ८२ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन
या सभेत जिल्ह्याचा खरीपाचा आढावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी सादर केला. त्यानुसार, जिल्ह्यात खरीप लागवडीचे क्षेत्र चार लाख ८२ हजार ६२० हेक्टर इतके असून  त्यावर या हंगामात ज्वारी २८ हजार ५०० हेक्टर, बाजरी २०० हेक्टर,  मका १० हजार ५०० हेक्टर,  कापूस एक लाख ६० हजार हेक्टर,  सोयाबीर एक लाख ६० हजार हेक्टर,  तूर  ६५ हजार हेक्टर,  मूग ३१ हजार हेक्टर,  उडीद  २५ हजार हेक्टर असे नियोजन असुन यंदाच्या नियोजनात १४० हेक्टर ज्युट व ७०० हेक्टरवर ओवा पिकाचे उत्पादन घेण्याचे नियोजनात समाविष्ट करण्यात आले आहे.
घरपोच निविष्ठांसाठी नियोजन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरपोच बियाणे व अन्य निविष्ठा मिळाव्या यासाठी  आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या १८०० शेतकरी गटांमार्फत  जिल्ह्यातील १००६ गावांत या कृषि निविष्ठा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सोयीच्या गटाकडे मागणी नोंदवल्यानुसार त्यांना निविष्ठा पोहोचविल्या जातील.  जिल्ह्यात बियाणे पुरवठा व  खते किटकनाशकांचा गुणवत्तापूर्ण व योग्य किमतीत पुरवठा व्हावा यासाठी  १८ गुण नियंत्रण कक्ष  स्थापन करण्यात आले असून नऊ  भरारी पथके तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी ८६ हजार ४०० मेट्रीक टन  खतांची आवश्यकता असून ८० हजार ८३० मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले आहे, असे सांगण्यात आले.  तसेच जिल्ह्यात  १ लाख ४४ हजार ६७० क्विंटल बियाण्यांची आव्श्यकता असून एक लाख २६ हजार २१४ क्विंटल साठा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त १३ हजार ४७५ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याची नोंदही कृषि विभागाकडे असल्याचे यावेळी माहिती देण्यात आली.
पिक उत्पादकता वाढीसाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे नियोजन
यंदाच्या खरीप नियोजनात पिक उत्पादकता वाढीसाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून  त्या पथदर्शी प्रकल्पात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक देण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी कृषि विभागाशी निगडीत विविध सहभागीदारांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्यात जिओल्ह्यात ४५६८ संस्थांना प्रत्येक गावाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या माध्यमातून पिकांच्या लागवड ते विक्री व विक्रीपश्चात प्रक्रिया या विविध टप्प्यांवर शेतीशाळा राबवून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या पिक उत्पादकता विकास कार्यक्रमात प्रामुख्याने  कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांच्या उत्पादन वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
या पथदर्शी प्रकल्पाची संकल्पना मान्य करुन पालकमंत्री ना. कडू यांनी सांगितले की, शेतकऱ्याला सर्व बियाणे, खते आदींचा पुरवठा योग्य वेळी व्हावा. तसेच कोणत्याही प्रकारे साठेबाजी व कृत्रिम भाव वाढ  होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. ज्या भागात साठेबाजी व भाववाढ होईल अशा भागात संबंधित व्यापाऱ्यावर तात्काळ व कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यात कडधान्य लागवडीला  चालना द्यावी, अशी सुचनाही त्यांनी केली.
कापुस खरेदीचे नियोजन सादर करण्याचे निर्देश
यावेळी आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख यांनी कापूस खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरु ठेवण्याबाबत येत असलेल्या अडचणींचा, त्यात लावला जाणारा दर, कापूस मोजण्यासाठी लागणारा विलंब याबाबींवर चर्चा करण्यात आली.  त्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील कापसाची खरेदी ३१ मे पर्यंत कशी पूर्ण होईल याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. लोखंडे यांना दिले. तसेच सर्व कापसाची खरेदी होण्यासाठी  सकारात्मकतेने नियोजन करावे. शेतकऱ्याला कमीत कमी वेळ लागावा यासाठी नियोजन करा.  काही कारणाने केंद्रावर आलेला कापूस परत पाठवला तर परत पाठवलेल्या कापसाची परतीच्या कारणांसह माहिती पाठवा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
रेशनकार्ड नसलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश
रेशन दुकानांवरुन कार्डधारकांना धान्य दिले जात असले तरी ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांना धान्य वाटपाबाबत काही उपाययोजना करता येईल का? अशी विचारणा  पालकमंत्री ना. कडू यांनी केली. त्यावर ज्या लोकांकडे कार्ड नाही अशा लोकांची माहिती संकलित करुन  ती त्वरीत  सादर करा असे निर्देश त्यांनी दिले. अशा लोकांना अन्य संस्थांच्या माध्यमातून व  ज्या लोकांकडे पुरेसे धान्य आहे त्यांनी आपल्याकडील जादाचे धान्य; धान्य बॅंकेत जमा करुन त्या मार्फत अशा लोकांना धान्य देण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न करावे असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ