कोरोनाला हरवून सात जण सुखरुप घराकडे; अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिला भावपूर्ण निरोप


अकोला,दि.२३(जिमाका)- पातूरचे सात जण  गेले २० दिवस कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन कोरोनाला हरवून आज सुखरुप घराकडे निघाले. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने त्यांना टाळ्या वाजवून भावपूर्ण निरोप दिला. या कोरोनावर विजय मिळविणाऱ्यांना निरोप द्यायला  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 हे सातही जण पातूरचे. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले ते शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी. तेव्हापासून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.  हे सर्वजण  दाखल होताच त्यांचेवर आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे उपचार सुरु झाले. हा उपचार कालावधी १४ दिवसांचा आहे. या कालावधीनंतर त्यांचे पुन्हा १५ तारखेला तपासणी करुन अहवाल  घेण्यात आले. त्यात ते निगेटीव्ह आले. तेव्हाच त्यांच्या प्रकृतीत उतार पडत असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतर अवघड अशा दोन दर चोवीस तासांनी घ्यावयाच्या चाचण्या महत्त्वाच्या असतात.  त्या पार पडल्या. त्यातही हे सगळे जण निगेटीव्ह आले. त्यामुळे ते बरे झाल्याचे शिक्कामोर्तब होण्याच्या जवळपास आले होते. त्यात  त्यांच्या अन्य एक्स रे आदी सगळं ओके आल्याने त्यांना घराकडे जाता येईल, असे डॉक्टरांनी निश्चित केले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना वार्डातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , डॉ. अपूर्व पावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकुमार शिरसाम व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या रुग्णांना थेट घरापर्यंत सोडायला रुग्णवाहिका देण्यात आली होती. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी रुग्णालयातून बाहेर पाऊल ठेवले. बऱ्याच दिवसांनी मोकळ्या हवेत आले होते. सर्व सुरक्षा उपकरणांनी त्यांनी स्वतःला कव्हर केले होते.  आता त्यांना आणखी चौदा दिवस घरातच अलगीकरण करुन रहावे लागणार आहे. या दरम्यानही त्यांच्या वैद्यकीय तपासण्या होणार आहेत असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
कोरोना विरुद्ध लढणारी टिम

कोरोना विरुद्धची लढाई त्या सातही जणांनी जिंकली होती. आणि त्या लढाईचे शिलेदार, साक्षीदार सगळं प्रशासन होतं. कोरोना विरुद्ध प्रत्यक्ष  रुग्णांच्या संपर्कात राहून उपचार करणाऱ्या या टिम मध्ये डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, डॉ.सुनिता आडे, डॉ.प्रिती लाहोरे, डॉ.श्रेय अग्रवाल, डॉ.अंकुश तोष्णिवाल, डॉ.मेघा आर्य, डॉ.मेघा चोपडे, डॉ.आमेरा सेत , डॉ.प्रविण सपकाळ, डॉ.संदीप आगरकर, डॉ.उपेंद्र कंझरकर, डॉ.विरेंद्र मोदी ,अधिसेविका श्रीमती.ग्रेसी मरीयम स्वच्छता निरीक्षक हेमंत इंगळे व उमेश रामटेके  यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या टिमचे कौतूक केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ