कोरोना संसर्गित रुग्णाची आत्महत्या


अकोला,दि.११ (जिमाका)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णांच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या एका कोरोना संसर्गित रुग्णाने स्वतःच्या मानेवर वार करुन आत्महत्या केली. काल(दि.१०) या रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे  अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली आहे.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे  अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हा ३० वर्षे वयाचा रुग्ण मंगळवार दि.७ तारखेपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे संशयित रुग्ण म्हणून उपचारासाठी दाखल होता. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास वार्ड क्रमांक २५ च्या प्रसाधनगृहात तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याने मानेवर वार केलेले होते. त्यातून खूप रक्तस्त्राव होत होता. त्यास तात्काळ शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. शर्थिचे प्रयत्न करुनही अतिरक्तस्त्राव झाल्याने  सकाळीळ ८ वाजून १० मि. नी त्याचा  मृत्यू झाला.
मयत रुग्ण हा हजरत निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून   बाळापूर येथे येऊन तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आला होता. उपचारादरम्यान तो मानसिक तणावाखाली होता, असे दिसून आले. त्याचे तज्ज्ञांनी समुपदेशनही केले होते. यासंदर्भात पोलीस, तसेच जिल्हाप्रशासनाला अहवाल दिल्याची माहितीही देण्यात आली आहे,असेही डॉ. पावडे यांनी कळविले आहे.
रुग्णाचे समुपदेशन करणार
डॉ. पावडे यांनी  कोरोना आजार हा योग्य औषधोपचार व सुरक्षा बाळगल्यास बरा होऊ शकतो. या आजाराबाबत लोकांनी गैरसमज बाळगू नये. भयभीत न होता या आजाराच्या उच्चाटनासाठी डॉक्टर व प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन केले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी  मानसोपचार तज्ज्ञांना समुपदेशनासाठी  पाचारण करण्याची उपाययोजना करण्यात आली असून  कोरोना कक्षाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर  लावण्यासाठीही कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ