ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्दाफाश; सायबर सेलकडे तक्रार दाखल


अकोला,दि.१२ (जिमाका)- समाजमाध्यमांद्वारे फसव्या जाहिरातींचा प्रसासर करुन ऑनलाईन मद्यविक्री करण्याच्या प्रकाराचा आज प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या जागरुकतेने पर्दाफाश झाला असून संबंधित सायबर चाच्या विरुद्ध सायबर सेल कडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, ९८६४७७१९५४ या क्रमांकावरुन फेसबुक व अन्य समाजमाध्यमांवर ऑनलाईन मद्यविक्रीची जाहिरात करण्यात आली होती. ही जाहिरात एका सुजाण नागरिकाने  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या आज निदर्शनास आणून दिली. निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी तात्काळ या  क्रमांकावर कॉल केला. संबंधित इसमाशी बोलणे झाल्यानंतर हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांच्या कानावर हा प्रकार घातला. ऑनलाईन मद्यविक्रीची कोणतीही परवानगी शासनाने दिली नसल्याचे श्रीमती सराफ यांनी स्पष्ट करताच यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आणखी काही क्रमांकांवरुन कॉल करुन संबंधित इसमाची कार्यपद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर संबंधित इसम हा ऑनलाईन पेमेंट मागतो, त्यासोबत क्रेडीट कार्ड वा एटीएम कार्डचे डिटेल्स मागतो, असेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच अधिक्षक स्नेहा सराफ यांनी  सायबर सेल कडे तक्रार दाखल केली असून सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
यासंदर्भात श्रीमती सराफ यांनी स्पष्ट केले आहे की, ऑनलाईन मद्यविक्री या प्रकाराला शासनाने कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही स्वरुपाच्या जाहिरातीला बळी पडून स्वतःची फसवणूक  करुन घेऊ नये, अशा जाहिरातीतून आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम