चालू महिन्यात ७९४५ मेट्रिक टन अन्नधान्य वाटपाचे नियोजन ;मोफत तांदुळ आजपासून उपलब्ध
अकोला,दि.७ (जिमाका)- कोरोना विषाणू
संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात सर्वांना
अन्नधान्य उपलब्धता व्हावी यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना
केल्या जात आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरजू
लाभार्थ्यांना धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून
जिल्ह्यातील तीन लाख दहा हजार ९५२ शिधापत्रिकाधारकांना ७९४५मे.टन धान्य सध्या
सुरु असलेल्या एप्रिल महिन्यात वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या
कालावधीचा गैरफायदा घेऊन टंचाई भासवून चढ्या दराने अन्न धान्याची विक्री करणाऱ्या
दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव
काळे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात एकूण तीन लाख १० हजार ९५१
इतक्या शिधापत्रिका आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व
प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही प्रकारच्या शिधापत्रिकांवरील पात्र
लाभार्थ्यांची संख्या ११ लाख २९ हजार ३४०
इतकी आहे. या लाभार्थ्यांना १०६१ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक
वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय
योजनेअंतर्गत प्रति कार्ड दोन रुपये किलो दराने २० किलो गहू आणि ३ रुपये किलो
दराने १५ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर
दिली जाते.तर केशरी शिधापत्रिकाधारक असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दोन
रुपये प्रति किलो दराने प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो
दराने प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ दिला
जातो.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति
लाभार्थी प्रति महीना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्डधारकाने
नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला पाच
किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने दिली आहे. त्यामुळे आता
प्रत्येक पात्र रेशनकार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ति पाच किलो
तांदुळ कुटुंबातील व्यक्तींच्या
संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येईल.
या योजनेकरिता ६६३७ मे. टन तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त झाले
आहे. पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हे
मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून महिन्यात सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले
जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी दिली आहे.
जास्त दराने
वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा
दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासनयंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र
सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक
वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्यादराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू
शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे
आदेश देण्यात आले असून त्यांमार्फत जादा दराने वस्तूंची विक्री करणाऱ्या
दुकानदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी
बबनराव काळे यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा