आपत्तीत संधी शोधून केली ग्राहक सेवा;अकोल्याच्या शेतकऱ्यांनी विकला ७ कोटी ७१ लक्ष रुपयांचा भाजीपाला


अकोला,दि.२३(जिमाका)- कोरोना संसर्ग आणि हा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉक डाऊन. यामुळे अनेकांना ही आपत्तीच वाटू लागली. या आपत्तीतच शेतकऱ्यांनी संधी शोधत आपत्तीचे रुपांतर इष्टापत्तीत केले. याकाळात लोकांना शेतातून थेट घरपोच भाजीपाला. फळे इ. वस्तू देऊन ग्राहकांची सेवा केली. गेल्या महिनाभराच्या लॉक डाऊनच्या काळात  आता ही शेतमाल थेट घरपोच पोहोचविण्याची साखळी चांगली विकसित झाली आहे.
अकोला जिल्ह्यात आत्मा मार्फत जे शेतकरी गट विकसित करण्यात आले आहेत. त्या शेतकरी गटांचे शेतकरी आपल्या शहरी बांधवांना चांगला , ताजा भाजीपाला स्वस्त आणि घरपोच देण्यासाठी सरसावले. त्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांचं नेतृत्व त्यांना लाभलं. शेतकऱ्यांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर परराज्यातही आपला माल पाठवला आहे. जिल्ह्यात आजमितीला ६९ शेतकरी गट आहेत जे भाजीपाला उत्पादन करत आहेत. या शेतकरी गटांना जिल्ह्यात विशेषतः नागरी भागात  ९३ ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरु केले.  तर या शेतकऱ्यांनी तब्बल ५१४ मेट्रीक टन इतका भाजीपाला व फळे इ. शेतीमाल विक्री केला. या मालाच्या विक्रीतून  ७ कोटी ७१ लाख रुपयांची  उलाढाल शेतकऱ्यांनी केली आहे.
 तालुकानिहाय शेतकरी गटांनी केलेले उत्पादन याप्रमाणे- अकोला ५३ गटांनी २६ विक्री केंद्रांमधून ९२.२० मेट्रीक टन माल विक्री केला. मुर्तिजापूर तालुक्यात ४१ गटांनी १० केंद्रांमधून ७८.५० मे. टन माल विक्री केला. बार्शी टाकळी तालुक्यात  ४३ गटांनी  १४ विक्री केंद्रांमधून  ६३.२० मे. टन माल विक्री केला. अकोट तालुक्यात ३७ गट १५ विक्रीकेंद्रांमधून  ७५.६० मे. टन मालाची विक्री करु शकले. तेल्हारा तालुक्यात  ३६ गटांनी १४ केंद्रांवर आपला ६९.८५ मे., टन माल विक्री केला. पातूर तालुक्यात ४० गटांनी ११ विक्री केंद्रावर ६९.६० मे. टन माल विक्री केला. तर बाळापूर तालुक्यात ३८ गटांनी  १४ केंद्रांवर ६४.८५ मे. टन मालाची विक्री केली.
या शेतकऱ्यांनी आपल्या विक्री केंद्रामार्फत मोबाईल वर ऑर्डर मागविण्यास सुरुवात केली. त्यावर प्राप्त ऑर्डरनुसार, मालाचे पॅकिंग करुन ग्राहकांना घरपोच माल दिला जातो. यासाठी अर्थातच किमान अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो ऑनलाईन पेमेंट स्विकारणे यासारख्या उपायांचा वापर केला. तसेच गावात वा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल घेऊन उभे राहतात. तेथे रितसर माल मोजून ग्राहकांना माल दिला जातो. हा सर्व माल अत्यंत स्वच्छ, ताजा आणि थेट शेतातून बाजारात वा ग्राहकांपर्यंत आलेला असतो. याचे दर अत्यंत कमी असतात. बाजारभावापेक्षा तरी खूपच कमी. मग  हे शेतकऱ्यांना परवडते कसे? तर त्यात शेतकरी ते ग्राहक या दरम्यान मधले घटक उदा. व्यापारी, आडते, वाहतुकदार इ. हे सगळे यात नाहीत. त्यामुळे वाहतुक होते ती थेट ग्राहकापर्यंत, त्यामुळे वाहतुक खर्चही येत नाही. साखळीतील अन्य घटक कमी झाल्याने भाव परवडतो. तो ग्राहकालाही  आणि शेतकऱ्यालाही. या सर्व कालावधीत या शेतकऱ्यांनी  ७ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. विभागीय तुलना केल्यास अकोला जिल्हा हा अमरावती विभागात सर्वाधिक उलाढाल करणारा जिल्हा ठरला आहे.
असा भाजीपाला असा भावः- कांदे- २० रू किलो,बटाटा - ३५ रू  किलो, काकडी - ३० रू किलो, लसूण ४०-रू पावशेर,गाजर – १० रू  पावशेर,भोपळा - १० रू/ नग,कोबी - पाच रू/पावशेर, टोमॅटो - २० रू/किलो,मिरची - १० रू पावशेर,गवार - १० रू/पावशेर, शेवगा - २० रू/पावशेर, गावरान लसुण - ४०रू/पावशेर,वांगी - १० रू/पावशेर, दोडका - २० रू/पावशेर,भेंडी - १० रु/पावशेर,कारले - १५  रू/पावशेर,तोंडली - २० रू / पावशेर,बीट - १० रू/ पावशेर,लिंबू - १० रू पावशेर.
पालेभाज्याः- मेथी - १५रु /जुडी, पालक - १५रू/जुडी,कोथिंबीर- २० रू जुडी,कोथिंबिर - १५ रू/पावशेर, कढीपत्ता(गावरान) - पाच रु., बारीक चिवय १५रु/पावशेर, ओली हळद २०रु/पावशेर,हळद पावडर.५० रु/ पावशेर
मोहरी २५.रु/पावशेर याप्रमाणे 
 भाजीपाला वितरण पद्धती- सर्व उत्पादने एका बॉक्स अथवा बॅग( पिशवी) मध्ये पाठविल्या जातात. ऑर्डर देण्याच्या वेळा निश्चित केल्या जातात व संचारबंदीतील शिथील कालावधीत सकाळी आठ ते बारा या वेळातच माल पोहोचविला जातो. किमान १०० रुपय किमतीचा माल बुक करावा लागतो. विकत घेतलेल्या उत्पादनाचे पैसे डिलेव्हरीचे वेळी रोख किंवा फोन पे.द्वारे करता येतात. प्रत्येक गट आपापल्या ग्राहकांना सोशल मिडीया वा अन्य संपर्क माध्यमांद्वारे संदेश पाठवून वेळोवेळी माहिती देत असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ