कृषि निविष्ठा शेताच्या बांधापर्यंत पोहोचवा-कृषि आयुक्तांचे निर्देश


अकोला,दि.२८(जिमाका)- राज्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. आणि किमान अंतर न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणुंचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना  सर्व कृषि निविष्ठा ह्या थेट यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचवता येण्याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश कृषि आयुक्तांनी दिले आहेत.
                        यासंदर्भात दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की,  जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी यांचा समन्वय ठेऊन करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत कृषि विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम केल्यास कषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर कषि निविष्ठांचा पुरवठा करणे शक्य होईल.
करावयाच्या उपाययोजना याप्रमाणे-
१) शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे आपली नोंदणी करावी. नोंदणी करताना ‘आत्मा’ अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे त्याच गटांकडे नोंदणी होईल, असे पाहावे. त्यानिमित्ताने १०० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.
२) शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/ गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत त्यांच्या नावासह, त्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.
३) कृषि विभागाच्या क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट पिकनिहाय तयार करुन शेतकऱ्यांना गटाद्वारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांनी समन्वयक म्हणून करावी.
४) निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणे/ खते / किटकनाशके खरेदी करावी. जेणेकरुन सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.
५)ज्या विक्रेत्यांना शक्य आहे. अशा विक्रेत्यांनी मोबाईल अॅप तयार करुन शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहच करावेत.
६) कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकी करीता कृषि विभागाच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरता आवश्यक असणारे परवाने कृषि विभागामार्फत गटांकरीता उपलब्ध करुन द्यावेत.
७)मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांचे मार्फत व्हिडीओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवुन आणावा जेणेकरुन सदर निविष्ठा खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्याकडून निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी.
८) शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पद्धतीने हाताळण्यात याव्यात. ९) निविष्ठा पुरवठ्याबाबत तालुकास्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा व दि.३१ मे २०२० पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरु होण्यापुर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे पहावे.
१०) ही कार्यप्रणाली यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्यास राज्य स्तरापासून ग्राम स्तरापर्यंत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.
असे निर्देश राज्याचे कृषि आयुत यांनी  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ