अकोला येथील व्हीआरडीएल प्रयोगशाळा कार्यान्वित; वाशीम, बुलडाण्यालाही लाभ;दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता

अकोला,दि.१२ (जिमाका)- कोरोना विषाणू चाचणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आजपासून कार्यान्वित झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली आहे.
 यासंदर्भात  या प्रयोगशाळेला मंजूरी मिळावी याबाबतचा अहवाल आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेकडे दि.७  (मंगळवार) रोजी पाठविण्यात आला होता. त्या अहवालाला बुधवारी (दि.८) मान्यता मिळाली. त्यानंतर लगेचच गुणवत्ता चाचणीची प्रक्रिया व नंतर अंतिम मान्यता असे सोपस्कार पार पाडल्यानंतर आता ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याचे, डॉ. पावडे यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात प्राप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रयोगशाळेची निर्मिती ही केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटूंबकल्याण विभाग योजने अंतर्गत विषाणू संशोधन व निदान  प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालयस्तरावर स्थापन करण्यात आली.  त्याअंतर्गत महाराष्ट्रात सहा ठिकाणी या प्रयोगशाळा उभारण्यात येत असून  त्यातील एक अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आली आहे.
अकोला येथील प्रयोगशाळेसाठी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत २०० चौरस मिटर जागा, आय.सी.एम.आर या संस्थेतर्फे या प्रयोगशाळा  उभारणीसाठी ५० लक्ष रुपये, बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी तसेच ९३ लक्ष रुपये  यंत्रसामुग्री, आवश्यक रसायने, किट्स, उपकरणे व फर्निचर यासाठी देण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेत  बायोसेफ्टी कॅबिनेट,  लॅमिनर एअर फ्लो,  ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगर, डीप फ्रिजर इ. आवश्यक साहित्यही प्राप्त होऊन बसविण्यात आले आहे.
या प्रयोगशाळेत  कोरोना संशयित रुग्णाच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासले जाणार आहेत.  या शिवाय  स्वाईन फ्ल्यू व अन्य विषाणूजन्य आजारांच्या चाचण्याही या प्रयोगशाळेत होऊ शकतील. दिवसाला किमान ८० नमुने तपासण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. या प्रयोगशाळेत शेजारच्या वाशीम व बुलडाणा येथील रुग्णांचे नमुनेही तपासण्यात येणार आहेत.   त्यासाठी कोल्डचेन मध्ये हे नमुने पाठविण्यात येतात.
मार्गदर्शन व सहकार्य- या प्रयोगशाळेची उभारणी करण्याकरीता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांनीही वेळोवेळी निधी उपलब्धता व अन्य कामांसाठी मार्गदर्शन केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले.
प्रयोगशाळेची उभारणी व कार्यान्वयन करणारी टिम-  अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे,  उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम,  उपवैद्यकीय अधिक्षक  डॉ. दिनेश नैताम,  सुक्ष्म जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. नितीन अंभोरे, प्रशासकीय अधिकारी  संजीव देशमुख,  डॉ. रुपाली मंत्री,  डॉ. पुजा शहा, डॉ. स्वाती गुप्ता,  डॉ. नाजनीन,  प्रदीप देशमुख, संदीप लोणारकर,  नासिर खान. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ