शुभवर्तमानःआठ पॉझिटीव्ह दुबार तपासणीनंतर निगेटीव्ह;३८९ पैकी २८५ जणांचे अहवाल प्राप्त, २४१ निगेटीव्ह


अकोला,दि.१६ (जिमाका)- जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार ३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आजअखेर २४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या मात्र १४ आहे. दरम्यान आठ पॉझिटीव्ह रुग्णांचे सात दिवसांच्या उपचारानंतर घेण्यात आलेल्या दुबार तपासणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाचाही समावेश आहे, असे जिल्हाप्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) ४५ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत ३८९ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी २८५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून २४१ निगेटिव्ह आहेत. तर १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली. या १४ पॉझिटीव्ह पैकी एकाचा अहवाल येण्याआधीच मृत्यू झाला तर अन्य एकाने आत्महत्या केली असल्याने  आता १२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील आठ जणांचे घशातील  स्त्रावाचे नमुने दुबार तपासणीसाठी पाठवले होते. सात दिवसांच्या उपचारानंतर केलेल्या या तपासणीचे हे अहवाल निगेटीव्ह आल्याने हे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांत अकोला जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचाही समावेश असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. आता या रुग्णांचे आणखी सात दिवसांनंतर घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या ४०७ असून त्यातील ७० जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात आहेत. ७७ जण विलगीकरणात आहेत.  अद्याप १६५ जणांचे अलगीकरणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप ५७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे.
आज दुपारनंतर ६६ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याने आता प्रलंबित अहवालांची संख्या ९० झाली आहे.
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी केली संयुक्त पाहणी
दरम्यान शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केली. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी अकोट फैल येथील मनपा दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली तसेच माणीक टॉकीज परिसरात बंदोबस्त पाहणी केली. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकांना तपासणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले. या भागातील नगरसेवकांनी आपल्या भागातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी झाली की नाही याबाबत कटाक्षाने दक्ष असावे असे  आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींनाही केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ