जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक: खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला,दि.२४(जिमाका)- आगामी हंगामासाठी आवश्यक कृषि निविष्ठांचे नियोजन करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आज  पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकार जितेंद्र पापळकर हे होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश  जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद मुरली इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक ठोसरे,जिल्हा व्यवस्थापक महाबीज खोकड, मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी मीना, माथाडी कामगार संघ सचिव नालींदे, निरीक्षक माथाडी मोरे, सीएससीआयचे मो. यामिन अन्सारी, कृषी व्यवसायिक संघटना सचिव राऊत आदी उपस्थित होते.
 यावेळी माहिती देण्यात आली की, यावर्षी हवामान खात्याने सरासरी, समाधानकारक व वेळेवर पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. करोना (कोविड-१९) विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे व कीटकनाशके या  कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी  निविष्ठांचे उत्पादन केंद्रे, साठवणूक केंद्रे, वाहतूक व जिल्हाअंतर्गत सर्व गावातील कृषी निविष्ठा केंद्रापर्यंत वितरण २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. तसेच रेल्वे स्टेशनवर आलेल्या खताचे रेक उतरवणे व ट्रकमध्ये खत भरणे यासाठी माथाडी कामगारांना त्यांचे मूळ ओळखपत्र ग्राह्य धरून त्यांना व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना घरून किंवा कार्यालयातून येण्या-जाण्याची मुभा देण्याचे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनास दिले. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होतील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश  संबंधित यंत्रणा कृषि विभागाचे अधिकारी, कृषी निविष्ठा उत्पादक, वितरक, वाहतूकदार व विक्रेते यांना दिले. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात अपेक्षित बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेण्यात आला.  तसेच बियाण्याची उपलब्धता व व आवश्यकता याचीही तुलना करण्यात आली.  त्याच प्रमाणे रासायनिक खतांचे आवंटन बी.टी. कापूस बियाणे याबाबतही आढावा घेण्यात आला. या संदर्भात सर्व आवश्यकतांनुसार साठा असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना वेळेवर व दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी यंत्रणेने सजग रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ