गोरगरीब कुटूंब दत्तक योजना;जिल्हा प्रशासनाचा पुढाकार


अकोला,दि.१६ (जिमाका)- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे  अनेक जणांचा रोजगाराअभावी घरी बसावे लागले. या लोकांना शासन विविध योजनांद्वारे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. असे असतांना समाजातील सधन व्यक्तिंनी पुढे येऊन आपल्या जवळपासची कुटूंबे दत्तक घेऊन त्यांना लॉक डाऊनच्या वाढलेल्या कालावधीत पालनपोषण करावे अशी योजना जिल्हा प्रशासनाने मांडली आहे.
या योजनेतून प्राधान्याने ज्यांना आधार संलग्नित प्रणालीतून रेशन धान्य मिळणे शक्य नाही., तसेच अत्यंत गरीब अशा व्यक्तींना व त्यांच्या कुटूंबियांना अन्न धान्य पुरविणे हा उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हास्तरीय, महापालिकास्तरावर मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली  आणि तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली  समित्या तयार करुन त्यामार्फत या योजनेचे काम चालविले जाईल. या योजनेच्या स्वरुपानुसार येत्या ३ मे पर्यंत समाजातील दानशूर, संपन्न कुटूंबातील व्यक्तींनी आपल्या भागातील शक्य तितक्या कुटूंबांना  १८ दिवसांसाठी पुरेल इतके गहू, डाळ, तांदूळ, तेल या वस्तू देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी. या योजनेत सेवाभावी संस्थाही सहभागी होऊ शकतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी समित्यांमार्फत समाजातील सधन लोकांना आवाहन केले जाईल. त्यातून लोकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून  या उपक्रमात सहभाग घ्यावा,असे या योजनेचे प्रारुप कर्ते निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ