ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला जि. प. विकासकामांचा आढावा‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना’ग्रामविकासाचा चेहरा ठरेल – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
ग्रामविकास
मंत्र्यांनी घेतला जि. प. विकासकामांचा आढावा
‘मुख्यमंत्री
समृद्ध ग्राम योजना’ग्रामविकासाचा चेहरा ठरेल
–
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
अकोला, दि. २९ : ग्रामविकासाचा
चेहरा म्हणून ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना’ येत्या 17 सप्टेंबरपासून राबवणार असून,
सर्व योजना यशस्वीपणे राबवणा-या गावांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट रस्ते, स्वच्छता सुविधा, कार्यालये,
शाळा, अंगणवाडी इमारती सुसज्ज असणार्या आणि इतर निकष पूर्ण करुन गावाचा विकास साधणाऱ्या
ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या उपक्रमात
सहभागी होऊन अधिकाधिक विकास साधावा, असे आवाहन, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री
जयकुमार गोरे यांनी आज येथे केले.
ग्रामविकास मंत्री श्री.
गोरे यांच्या अध्यक्षतेत अकोला जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांची आढावा बैठक संविधान
सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार
अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा
परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड
यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी ग्रामविकास
मंत्र्यांनी १०० दिवसांच्या सातकलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. ते
म्हणाले की, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संकेतस्थळाचा प्रभावी वापर
व्हावा. ई-ऑफिस प्रणालीचा वापर करतानाच ब्रॉड
बँड कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मार्गी लावावा. सर्वांसाठी घर योजनेत महाराष्ट्रात यंदा
विक्रमी ३० लक्ष घरे मंजूर करण्यात आली आहेत. शासनाने जाहीर केल्यानुसार घरकुलांसाठी
वाळू उपलब्ध करून द्यावी. शिबिर व सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूला घरकुल
मिळवून द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पं. स. साठी अद्ययावत
इमारती
अकोला जिल्ह्यातील जुन्या
इमारतीत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारती पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी पहिल्या
टप्प्यात ३ पं. स. इमारती पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जि.
परिषदेच्या इमारतीसाठीही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले
की, बचत गटातील महिलांची उत्पादने सर्वदूर पोहोचावी यासाठी विपणनाचे भक्कम जाळे निर्माण
करावे. ‘उमेद मॉल’ची निर्मिती करून या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी.
ग्रामसमृद्ध योजनेत राज्य पातळी, विभागीय पातळी,
जिल्हा पातळी व तालुका स्तरावर मोठ्या रकमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्यात सर्व
गावांनी सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा