'धरती आबा अभियाना'त गावोगाव शिबिरांना सुरूवात







'धरती आबा अभियाना'त गावोगाव शिबिरांना सुरूवात

अकोला, दि. 18 :दुर्गम भागातील आदिवासी समुदायाला मूलभूत सुविधा, तसेच आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरांना सुरूवात झाली आहे.

अकोला जिल्ह्यात आज बार्शिटाकळी तालुक्यात जांभरुण ,टिटवन, पातूर तालुक्यात नवेगाव, पांगरताटी, तेल्हारा तालुक्यात धोंडा आखर आदी ठिकाणी शिबिरे घेऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या व त्यांना दस्तऐवज अद्ययावत करून देणे, मार्गदर्शन आदी प्रक्रिया पार पाडण्यात आली.  

धोंडाआखर येथील शिबीरात महिला बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांनी भेट देऊन जन्म नोंदणी आधार लिंक व अपडेट करण्याबाबत अडचणी जाणून मार्गदर्शन केले. अधिका-यांसमवेत अंगणवाडी निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.  

'धरती आबा अभियान' (जागरूकता व सेवा पोहोचविण्याची मोहीम) आणि 'धरती आबा कर्मयोगी' (कौशल्य व क्षमता विकास कार्यक्रम) या माध्यमातून अनेक क्षेत्रातील शासकीय सेवा थेट गावांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याच दृष्टीने शिबिरांचे नियोजन आहे. अधिका-यांनी शिबिराला भेटी देऊन विविध योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना करून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

शिबिरांच्या माध्यमातून मतदाता ओळखपत्र, आधार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्मान भारत आरोग्य पत्रिका, जात प्रमाणपत्र, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, जन धन खाते अशा अत्यावश्यक सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. अनेक अडथळ्यांमुळे लाभ मिळवू न शकलेल्या आदिवासी कुटुंबांपर्यंत महत्त्वाच्या सेवा आणि योजना पोहोचवण्यास मदत होणार आहे.

 

जिल्ह्यातील आदिवासीबहुल ४३ गावांमध्ये प्राधान्याने उपक्रम पोहोचवून अधिकाधिक गरजूंना लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा