कृषी विभागाकडून पीकस्‍पर्धा जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन

कृषी विभागाकडून पीकस्‍पर्धा

जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन

अकोला, दि. 29 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतक-यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पीकस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रब्‍बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस आदी पीकांसाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रयोगशील शेतक-यांचे मनोबल उंचावण्यासाठी व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराकडे कल वाढविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रब्‍बी हंगामासाठी तालुका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पाच पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.

पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), प्रवेश शुल्काचे चलन, सातबारा, आठ-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आवश्यक आहे. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम तीनशे व आदिवासी गटासाठी रक्कम दीडशे रू. प्रवेश शुल्क राहील.

आकर्षक बक्षीसे

राज्य पातळीवर 50 हजार, 40 हजार व 30 हजार रू. अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे आहेत. जिल्हा पातळीवर दहा, सात व पाच हजार रू. आणि तालुका पातळीवर पाच, तीन व दोन हजार रू. अशी अनुक्रमे तीन बक्षीसे आहेत.

पीकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी  पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावे, असे  आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात आले आहे. अधिक माहितीसाठी  शेतकरी  बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र  शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :