जिल्ह्यातील तीन मतदारसंघात 14 नोव्हेंबरपासून गृह मतदान
अकोट व अकोला पूर्व मतदारसंघात गृह मतदानाला मोठा प्रतिसाद
जिल्ह्यातील तीन मतदारसंघात 14 नोव्हेंबरपासून गृह मतदान
अकोला, दि. 12 : विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व व अकोट मतदारसंघात गृह मतदानाचे प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, ते 100 टक्क्यांवर पोहोचण्यासाठी पुन्हा ‘ड्राईव्ह’ घेण्यात येत आहे. बाळापूर, मूर्तिजापूर व अकोला पश्चिम मतदारसंघात दि. 14 व दि. 15 नोव्हेंबरला गृह मतदान होणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता व कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वयोवृध्द मतदार व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
अकोला पूर्व व अकोट मतदारसंघात गृह मतदानामध्ये 85 वर्षावरील वयोवृध्द मतदार आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा लाभ घेत लोकशाहीच्या पर्वात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आहे. अकोला पूर्व मतदारसंघात 764 मतदारांपैकी 721 मतदारांनी गृह मतदान केले आहे. अकोट मतदारसंघात 506 मतदारांपैकी सुमारे 95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे, या मतदारसंघांत दि. 15 नोव्हेंबरला पुन्हा उर्वरित मतदारांच्या घरी पथके पोहोचणार आहेत.
बाळापूर मतदारसंघात 776, अकोला पश्चिम मतदारसंघात 423 व मूर्तिजापूर मतदारसंघात 444 मतदार गृह मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या तिन्ही मतदारसंघांत दि. 14, 15 व 16 तारखेला गृह मतदान होणार आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा