ग्रा. पं. ची सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागरचना
ग्रा. पं. ची सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागरचना
अकोला, दि. 29 : जानेवारी 2025 ते डिसेंबर 25 या कालावधीत मुदत संपणा-या, तसेच नव्याने स्थापित होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम ग्रामविकास विभागाने जाहीर केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभाग रचना पूर्ण करावी, अशा सूचना ग्रा.पं. निवडणूक शाखेचे प्र. अधिकारी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी तालुका यंत्रणांना दिल्या आहेत.
विहित कालावधीत प्रभाग रचनेचा कार्यक्रम पू्र्ण करावा, अशा सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमानुसार, तहसीलदारांनी दि. 2 डिसेंबरपूर्वी गुगल अर्थचे नकाशे सुपरइंपोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करावयाचे आहेत. त्यानंतर दि. 5 डिसेंबरपूर्वी तलाठी व ग्रामसेवकांकडून संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून सीमा निश्चित करण्यात येतील. त्याची तपासणी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील गटविकास अधिकारी व मंडळ अधिका-याचा समावेश असलेली समिती दि. 11 डिसेंबरपूर्वी पूर्ण करेल. उपविभागीय अधिका-यांमार्फत दि. 16 डिसेंबरपूर्वी प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवला जाईल. जिल्हाधिका-यांकडून प्रारूप प्रभाग रचना तपासणी करून आवश्यक दुरूस्त्या करून दि. 19 डिसेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल. राज्य निवडणूक आयोगाकडून दि. 24 डिसेंबरपर्यंत दुरूस्ती आवश्यक असेल तर ती करून मान्यता दिली जाईल. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक दुरूस्त्या करून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती दि. 27 डिसेंबरपर्यंत रचनेला मान्यता देईल.
त्यानंतर तहसीलदारांकडून दि. 30 डिसेंबरपर्यंत हरकतीची अधिसूचना काढण्यात येईल. दि. 6 जानेवारीपर्यंत प्राप्त सूचना, हरकती उपविभागीय अधिका-यांना पाठविण्यात येतील. उपविभागीय अधिका-यांकडे दि. 14 जानेवारीपर्यंत हरकतींवर सुनावण्या होतील व दि. 20 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिका-यांकडे सादर केले जाईल.
जिल्हाधिकारी हे उपविभागीय अधिका-यांकडे प्राप्त प्रस्ताव तपासून दि. 22 जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करतील. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर दि. 24 जानेवारीपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा