खोडसाळ संदेश प्रसारित झाल्यावरून पोलीसांत तक्रार मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करणार - निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव

 

खोडसाळ संदेश प्रसारित झाल्यावरून पोलीसांत तक्रार

मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी कारवाई करणार

-        निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव

अकोला, दि. 17 : मतदार व निवडणूक कर्मचा-यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा खोडसाळ संदेश सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची तक्रार अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकारे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे संदेश कुणी पाठवल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्रीमती भालेराव यांनी दिला आहे.

काही अज्ञात व्यक्ती चुकीची माहिती व खोडसाळ संदेश प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, अशी व्यक्तीदेखील मतदान करू शकेल. मतदान केंद्रावर फॉर्म क्र. 17 भरून व मतदानकार्ड दाखवून मतदान करता येईल’, अशा आशयाचा निखालस खोटा संदेश सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे.

हा संदेश पूर्णपणे चुकीचा असून, मतदारांची दिशाभूल करणारा आहे. मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव समाविष्ट असणे अत्यंत महत्वाचे आहे. स्थलांतरित, मयत किंवा दुबार नाव असलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत स्थळपाहणी करून संबंथितांचे फॉर्म क्र. 7 भरून घेऊन व आवश्यकतेप्रमाणे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेऊन वगळण्यात आले आहेत. त्यामुळे नियमानुसार वगळलेल्या व्यक्तींना मतदान करता येणार नाही.

त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही संदेश कुणीही फॉरवर्ड केल्यास किंवा प्रसारित केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भालेराव यांनी दिला आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम