जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ‘आरओं’ची बैठक मतदान चिठ्ठ्यांचे वेळेत वितरण करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 






अकोला, दि. 13 : यादीतील नाव, अनुक्रमांक, केंद्र क्रमांक आदी माहिती मतदारांना सुलभपणे मिळावी यासाठी मतदान चिठ्ठ्यांचे (व्होटर स्लीप) वेळेत वितरण व्हावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी यांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते. 


जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, मतदान चिट्ठ्यांचे ( व्होटर स्लीप ) अचूकपणे घरोघर वाटप व्हावे. मतदार यादीमधील नाव, अनुक्रमांक वेळेत कळले नाही तर मतदारांना अडचणी येतात. त्यांना सुलभपणे ही माहिती मिळाली तर मतदानाचे प्रमाण वाढेल. प्रत्येक मतदाराला त्याची स्लिप त्याला घरपोच द्यावी. 

ते पुढे म्हणाले की, मतदानाचा दिवस येण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक असून, सर्व यंत्रणांना अधिक सजग होऊन कामे केली पाहिजेत. नियमानुसार करावयाची प्रत्येक गोष्ट रोज ‘मॉनिटर’ करा. तपासणी पथकांकडून योग्य कार्यवाही होते किंवा कसे, याबाबत संनियंत्रण करावे. निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवरील वेब कास्टिंग योग्यरीत्या होईल, याची खबरदारी घ्यावी. सूक्ष्म निरीक्षकांचे एक प्रशिक्षण झाले आहे. दुसरे प्रशिक्षण पूर्ण व्हावे.

मतदान केंद्रे वीज, पाणी आदी सोयींनी सुसज्ज करतानाच सायंकाळच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन पुरेशा सुविधा असाव्यात. प्रकाशासाठी वीजेबरोबरच इतर पर्यायी व्यवस्था ठेवावी. मतदान पथकांना आवश्यक सुविधा द्याव्यात. गत निवडणुकीत ज्या क्षेत्रात 50 टक्क्यांहून कमी मतदान झाले तिथे प्रभावी जनजागृती करावी. घरभेटी द्याव्यात. आवश्यक तिथे स्वयंसेवकांची मदत घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

आवश्यक वाहनव्यवस्था, मनुष्यबळ, सी-व्हिजील, तपासणी पथके आदी विविध विषयांचा आढावा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी घेतला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले