जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला आजपासून सुरूवात प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करा : जिल्हाधिकारी


 

जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला आजपासून सुरूवात

प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करा : जिल्हाधिकारी

अकोला, दि. 25 : जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेला आजपासून सुरूवात झाली असून, ती 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होईल. पशुसंवर्धन खात्याचे 138 प्रगणक ग्रामीण भागात घरोघर फिरून माहिती गोळा करणार आहेत. नागरिकांनी माहिती देऊन प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालन महत्वाची भूमिका बजावते. भारतात पशुगणना 1919 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून दर पाच वर्षात एकदा पशुगणना केली जाते. आतापर्यंत 20 पशुगणना झाल्या असून, यापूर्वीची गणना 2019 मध्ये झाली होती. त्यानुसार जिल्ह्यात 5 लाख 20 हजार 151 पशुधन होते. आता 21 वी पशुगणना सव्वातीन महिने चालणार असून, पाळीव प्राणी, कुक्कुट, भटक्या प्राण्यांची आकडेवारी प्राप्त होणार आहे.

प्रगणकांकडून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढव, हत्ती, मिथुन अशा विविध पशुप्रजातींची माहिती संकलित करण्यात येईल. प्राण्यांचे वय, लिंग, जात, प्रजाती, मालकी हक्क आदी 15 प्रजातींच्या माहितीबरोबच 219 स्वदेशी जातींच्या नोंदीही घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे, पशुपालकांची नोंदणीही याद्वारे शक्य होणार आहे.

पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडविण्यासाठी शासन विविध योजना राबवते. आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन पशुपालन वाढविण्यावर भर आहे. पशुधन क्षेत्राचा विकास व सुधारणा घडविण्यासाठी ही गणना अत्यंत महत्वाची आहे. त्याचा शासनाला धोरणे आखण्यासाठी व योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होतो. 21 व्या पशुगणनेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पशुपालकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :