पथक व ईव्हीएमची वाहतूक अधिकृत वाहनातूनच
पथक व ईव्हीएमची वाहतूक अधिकृत वाहनातूनच
नंबरप्लेट नसलेल्या निवडणूक वाहनाबाबतची ती बातमी चुकीची
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 19 : अकोला पश्चिम मतदारसंघात नंबरप्लेट नसलेल्या एका काळ्या
रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून ईव्हीएमची वाहतूक झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांत प्रसारित
झाली. ती पूर्णपणे चुकीची असून, हे वाहन निवडणुकीच्या कामासाठी अधिकृत केलेले वाहन
असल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाहन निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या वाहन पुरवठादाराकडून पुरविण्यात
आले आहे. त्याचा वाहन क्रमांक महाराष्ट्र-30 बीएल 9602 असा असून, हे वाहन श्री. शशिकांत
बाळकृष्ण गायकवाड यांच्या नावाने नोंद आहे. या वाहनावर संकेत गायकवाड हे वाहनचालक काम
करत होते. सदरील वाहनातून ज्या मतदान पथके व ईव्हीएमची वाहतूक झाली आहे, ती पथके व
साहित्य मतदान केंद्र क्र. 114 व 115 (डॉ.
इक्बाल उर्दू पूर्व माध्यमिक शाळा, भीमनगर, अकोला) या मतदान केंद्रावर पोहोचले आहे.
अधिकृत वाहनातूनच या ईव्हीएमची वाहतूक करण्यात आली आहे. तसेच, सदरील वाहनाच्या मागील
बाजूची नंबरप्लेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर डबलटेप निघाल्यामुळे पडली व वेळेअभावी
तशीच ठेवण्यात आली होती. या व्हिडीओमध्ये योग्यप्रकारे पाहिल्यास पुढील बाजूची नंबरप्लेट
सुस्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच, या वाहनाच्या काचेवरतीदेखील ‘ऑन इलेक्शन ड्युटी’
असे ठळक नमूद आहे. हे वाहन वैधरीत्या भारत निवडणूक आयोगाच्या कामासाठी अधिकृत केलेले
वाहन आहे. कोणत्याही अनधिकृत वाहनातून ईव्हीएमची वाहतूक झालेली नाही किंवा कुठलाही
गैरप्रकार झालेला नाही. प्रशासन निष्पक्ष, तसेच पारदर्शकपणे निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध
आहे, अशी ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा