मतदानापूर्वीच्या 48 तासांसाठी विविध निर्बंध जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून आदेश जारी
मतदानापूर्वीच्या 48 तासांसाठी विविध निर्बंध
जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडून आदेश जारी
अकोला, दि. 14 : विधानसभा निवडणूकीत अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघांसाठी
दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. त्यामुळे अकोला
जिल्ह्यात दि. 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 पासून ते दि. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया
संपेपर्यंत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी
अजित कुंभार यांनी निर्गमित केला आहे.
या कालावधीत बेकायदेशीर जमाव
एकत्र गोळा करण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. मतदान पथके मतदान केंद्रावर
पोहोचल्यावर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पूर्णपणे
निर्बंध राहतील. राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदार अनुक्रमांक, केंद्र आदी अनौपचारिक
ओळखचिट्ठ्या केवळ पांढ-या कागदावर मतदारांना देता येतील. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक
चिन्ह असता कामा नये. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत असे चिठ्ठीवाटप करता येणार
नाही.
निवडणूक कर्तव्यावरील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी राहील. मतदान
केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त केवळ निवडणूक
आयोगाचे प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहील. इतरांना प्रवेशावर बंदी
आहे.
मतदारांना लाच देणे, गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी
करणे, तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहील. मतदारांची
ने-आण करण्यासाठी वाहन वापरणे हा अपराध आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, कार,
ट्रक, रिक्षा, मिनीबस, व्हॅन, स्कूटर आदींना बंदी राहील.
मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राच्या
परिसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्याचे प्रदर्शन करता येणार नाही.
ज्या व्यक्तीला सरकारी सुरक्षा देण्यात आली आहे, अशा व्यक्तीच्या सुरक्षा
कर्मचा-यांना केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही. सरकारी किंवा खासगी
सुरक्षारक्षक असलेल्या व्यक्तीला निवडणूक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
करण्यास बंदी आहे.
मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथकप्रमुख, निवडणूक
सुरक्षा कर्मचारी वगळता इतरांना मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट मतदान केंद्रात नेता
येणार नाही.
खालील बाबींवर बंदी नाही
निवडणूक प्रचार दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. बंद होणार असला
तरीही घरोघर (डोअर टू डोअर), प्रचारावर निर्बंध नाही. मात्र, पाचहून अधिक व्यक्तींना
एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. रूग्णालयाची वाहने, रूग्णवाहिका, दुधगाड्या, पाणीपुरवठा
वाहने, अग्निशमन बंब, पोलीस, वीज, निवडणूक कर्मचा-यांच्या वाहनांवर बंदी नाही. विहित
मार्गाने जाणा-या बसगाड्यांवर बंदी नाही. रेल्वेस्थानक, बसस्थानकाकडे जाणा-या वाहनांवर
बंदी नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वैयक्तिक वाहनास
किंवा निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिव्यांगांसाठी नेमून दिलेल्या वाहनास बंदी नाही.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा