अन्न भेसळ

विशेष लेखः-

 

जीवन जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे. शरिरास विवधि क्रियांसाठी लागाणाऱ्या उर्जेसाठी अन्न हे प्रमुख व आवश्यक असा घटक आहे. बाजारात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत आणि आपण सर्वजण भाज्या, फळे, तरणधान्ये, कडधान्ये, शेंगा इत्यादीसह विविध अन्न स्रोतांवर अवलंबून असतो. सामान्य जिवनात अन्न पदार्थ खरेदी करतांना कधी कधी आपणास भेसळयुक्त अन्न पदार्थ वापरात येतात. कधी धान्यात लहान खडे किंवा दुधात पाण्याची भेसळ असल्याचा संशय होतो. आधुनिकरणामुळे आर्थीक फायद्यासाठी होणारी भेसळ अत्यंत नगण्य प्रमाणात झाली तरी आजही ग्रहकांना याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे.

 

अन्न भेसळ म्हणजे काही बाह्य पदार्थ टाकून, किंवा काही घटक वगळून अन्न पदार्थाचा दर्जा कमी करणे किंवा अन्न पदार्थ असुरक्षित बनवणे. भेसळकारी पदार्थ (Adulterant) म्हणजे कोणतीही सामग्री जी अन्न असुरक्षित किंवा कमी दर्जाचे बनवण्यासाठी वापरली जाते. भेसळकारी पदार्थ हे खाद्य किंवा अखाद्य असु शकतात. अन्नात भेसळ करण्याचे वेगवेगळे कारण असु शकतात जसे की, व्यवसाय धोरणाचा एक भाग म्हणून इतर काही खाद्य पदार्थांचे अनुकरण, योग्य अन्न बनवण्याचे ज्ञान नसणे, अन्न उत्पादनाचे प्रमाण वाढवणे, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी अन्नाची मागणी पुरविणे, कमी गुंतवणुकीतून खाद्य पदार्थांमधून जास्तीत जास्त नफा मिळवणे इ. भेसळ करण्याचे सामान्य प्रकार पुढील प्रमाणे आहे. फळे लवकर पिकण्यासाठी काही रसायने वापर करणे, कुजलेली फळे आणि भाज्या चांगल्या फळांमध्ये मिसळणे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही नैसर्गिक आणि रासायनिक रंग जोडणे, धान्य, कडधान्ये आणि इतर पिकांसाठी माती, खडे, दगड, वाळू इत्यादींचे मिश्रण, उत्पादनाचे वजन वाढवण्यासाठी स्वस्त आणि निकृष्ट पदार्थ पूर्णपणे किंवा अंशतः चांगल्या पदार्थांसोबत जोडले जातात. हे भेसळयुक्त अन्न शरिरास अपायकारक व असुरक्षित असु शकते. याचे दिर्घ काळासाठी वापर आरोग्यविषयक समस्या, पौष्टिकतेची कमतरता व इतर विकार होवु शकतात.

 

विविध अन्न पदार्थातील भेसळ ओळखण्याची सोप्या पध्दती

 

अ.क्र.

अन्न पदार्थांचे नाव

भेसळकारी पदार्थ

भेसळ ओळखण्यासाठीची पध्दत

1

दुध

पाणी

दुधाचा थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठभागावर टाकल्यास पाणी मिश्रीत दुधाचा थेंब लवकर खाली ओघळतो तर शुध्द दुधाचा थेंब सावकाश खाली ओघळतो.

(टिप :- सदर चाचणी स्किम मिल्क पावडर मिसळलेल्या दुधास लागू होत नाही)

 

 

पिष्टमय पदार्थ (स्टार्च)

दुधामध्ये आयोडीनचे थेंब टाकल्यास दुधास निळा रंग येतो.

2

खवा पनीर

पिष्टमय पदार्थ (स्टार्च)

प्रथम खवा व पाणी एकत्र उकळून घ्यावे. ते थंड झाल्यानंतर त्यात आयोडीनचे काही थेंब टाकल्यास निळा रंग येतो यावरुन खव्यात पिष्टमय पदार्थांची भेसळ असल्याचे सिध्द होते.

3

पिठी साखर

खडू पावडर

एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेवून त्यात अंदाजे 10 ग्रॅम साखर विरघळवल्या खडुची भुकटी ग्लासच्या तळाशी साचल्याचे दिसून येते.

4

मध

साखरेचे द्रावण

शुध्द मधात कापूस बुडवून जाळल्यास तो लगेच जळतो. परंतु मधात साखरेचे द्रावण मिसळले असल्यास पाणी कापसाला जळू देत नाही आणि जरी कापूस जळाला तरी तडतड आवाज येतो.

5

मोहरी

आरजीमोन बी (पिवळा धोतरा)

अरजीमोन बी हे दिसण्यास मोहरी सारखे आहे. आरजीमोन बीयाचा पृष्ठभाग हा खडबडीत असतो. तर मोहरीचा गुळगुळीत असतो. सदर बाब बारीक निरीक्षणानंतर दिसते.

6

काळी मिरी

पपईच्या बिया

पपईच्या बिया ह्या आकसलेल्या व निमुळत्या असतात व त्यांचा रंग फिकट असतो.

 

 

मिनरल ऑईलचा थर

काळी मिरी जास्त चमकदार दिसते.

7

कुटलेले मसाले

पिष्टमय पदार्थ

आयोडीन टाकल्यास निळा रंग येतो.

8

मिरची पावडर

विटांची भुकटी

मीठ टाल्कम पावडर

एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकल्यास ग्लासाच्या तळाशी साचलेला थर चिकट लागल्यास वीटाची भुकटी असल्याचे सिध्द होते व साबणासारखा गुळगुळीत लागल्यास टाल्कम पावडर असल्याचे सिध्द होते.

 

 

दुधातील भेसळ ओळखण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना केल्या पाहिजे.

 

Ø  दुधाची खरेदी 'प्राधिकृत व्यक्ती' कडूनच करावी. दुधाची खरेदी 'परवाना/नोंदणीप्रमाणपत्र' धारक विक्रेत्यांकडूनच करावी.

 

Ø  दुधाची खरेदी करताना पिशवीचा एखादा कोपरा कापून पुन्हा सिल केला आहे काय ? (टॅम्परींग केले आहे का ? )

 

Ø  याची खातरजमा होण्यासाठी दुधाच्या पिशवीचे सिलबंद केलेले दोन्हीकडील भाग काळजीपूर्वक तपासावेत. पॅकबंद पिशविचे पॅक केलेले भागावर बोट फिरविल्यास बोटाला ते करवता (झिगझॅग) सारखे जाणवेल.

 

Ø  दुधाच्या पिशवीचा एखादा कोपरा कापून पुन्हा सिल केला असल्यास पिशवीचा पुन्हा सिल केलेल्या भागावर बोट फिरविल्यास सदरचा भाग बोटाला गुळगुळीत जाणवेल.

 

Ø  दुधाची पिशवीचे तोंड निट तिरकस कापावे व रिकाम्या पिशवीचे जास्तीत जास्त तुकडे करावेत जेणेकरून त्या पिशवीचा पुनर्वापर होणार नाही.

 

Ø  दुधाची खरेदी करताना पिशवीवरील ब्रॅण्डचे नाव, दुधाचा प्रकार व उत्पादकाचे नाव यासह 'वापर करण्याचा दिनांक' (Use by Date) तपासावा.

 

Ø  आपला दुध विक्रेता किंवा दुध घरपोच करणारी व्यक्ती कोण आहे याची खात्रीशीर माहिती प्राप्त करून घ्यावी.

 

 

दुधामुळे होणा-या विषबाधा टाळण्यासाठी पुढील प्रमाणे उपायोजना कराव्यात.

 

Ø  फक्त उकळलेल्या दुधाचा वापर करा. कच्च्या, शिळया किंवा वास येणाऱ्या दुधाचा वापर करू नका. अशा दुधात रोग जंतूची (बॅक्टेरीया) झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते.

 

Ø  चांगली कल्हई असलेल्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यांचा दुध उकळविण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उपयोग करा. ही पातेली शक्यतो गरम पाण्याने धूवून प्या.

 

Ø  दूध हाताळतांना हात स्वच्छ धुतलेले असावेत. दुधाचा भांडयावर नेहमी झाकण ठेवा जेणे करून पाल व इतर किटक दुधात पडणार नाहीत.

 

Ø  उकळलेले दूध थंड जागेत ठेवा. यासाठी रेफ्रिजरेटर हवा असे नाही. एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून दुधाचे पातेले त्यात ठेवा किंवा तुमच्या घरातील मोकळ्या व थंड जागेत दुध झाकून ठेवा.

 

Ø  आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. तेथे रोगजंतू पसरविणाऱ्या माशा किंवा इतर किटक येणार नाहीत याची काळजी घ्या.

 

नागरीकांनी पुढील प्रमाणे अन्नपदार्थ खाणे टाळावे.

 

Ø  बर्फयुक्त पेय :- कारण यात वापरलेला बर्फ अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला असण्याची शक्यता असते.

 

Ø  दुधापासून तयार केलेली मिठाई :- जर ती ताजी नसेल आणि थंड ठिकाणी साठविलेली नसेल तर खाणे टाळावे.

 

Ø  तयार मटन-चिकन, अंडी, मासे या पासुनचे पदार्थ :- जर ताजे तयार केलेले नसतील तर खाणे टाळावे.

 

Ø  कच्ची फळे व सॅलडस् :- स्वच्छ व भरपूर पाण्याने धुतलेली नसतील तर खाणे टाळावे.

 

फेरीवाल्याकडील कुल्फी, आईसक्रीम, गोळया, बर्फगोळा आपल्या मुलांना देवू नका. त्यामध्ये अखाद्य रंग, गोडी आणणारे विषारी पदार्थ असण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे लहान मुलांना हगवणीची लागण वारंवार होते. त्यामुळे त्यांना जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घेण्याची सवय लावणे आवश्यक आहे. तसेच त्यांची नखे वाढू देवू नयेत.

सामान्य ग्राहक, अन्न व्यवसायिक व कायदा अंमलबजावणी यंत्रणा मिळून एकमेकांच्या सहकार्याने अन्नातील भेसळ यशस्वीपणे रोखू शकतो.

 

लेखक: फरीद सिद्दीकी
बी.टेक (अन्न विज्ञान)
अन्न सुरक्षा अधिकारी, FDA महाराष्ट्र

संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा