राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम :सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करा-अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

 अकोला, दि.१४(जिमाका)-राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत  तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत असतांना सार्वजनिक ठिकाणी  तंबाखू पदार्थ्यांचे सेवन, धुम्रपान आदी कृत्य करुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आज येथे दिले.

            राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा  आज अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस  जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी  डॉ. फारिस अहसन,  जिल्हा सल्लागार डॉ. प्रीती कोगदे,  सहायक पोलीस निरीक्षक  महेश गावंडे, अशासकीय सदस्य तसेच इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चांदरानी, डॉ. मोहन खडसे आदी उपस्थित होते.

जिल्हा सल्लागार डॉ. प्रीती कोगदे यांनी माहिती सादर केली. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २९७ जणांवर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनासंदर्भात कारवाई करण्यात आली असून त्याद्वारे १५ हजार ७२७ रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले.  तसेच अन्न औषध प्रशासन विभाग व पोलीस दल यांच्या वतीने कारवाई करुन तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ, गुटखा इ. जप्त करुन नष्ट करण्यात आले. जप्त करुन नष्ट केलेल्या मालाची किंमत एक कोटी ८८ लाख  ९६ हजार ८६० रुपये इतकी आहे. आता पर्यंत या संदर्भात २७२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तंबाखू सेवनाची सवय जडलेल्यांना व्यसन सोडविण्यासाठी  समुपदेशन देण्यात येते त्याचा लाभ ४६७ जणांनी घेतला आहे.

            अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे,  तंबाखू गुटखा सेवन करणे याबाबत संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी कायद्याची माहिती करुन देऊन कारवाई करावी.  अशा कारवाईसाठी पोलीस दलाने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी एक व्यापक जनजागृती मोहिम राबवावी. त्यात महाविद्यालयीन युवक युवतींचा सहभाग घ्यावा,असेही निर्देश खंडागळे यांनी दिले. धम्मसेन शिरसाट, नंदन चोरपगार यांनी परीश्रम घेतले.

०००००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ