वैद्यकीय उपकरणे उत्पादकांना उपकरणांची नोंदणी करण्याचे आवाहन

 अकोला, दि.१७(जिमाका)- रुग्णांच्या रोगनिदानासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांच्या उत्पादकांनी केंद्रशासनाच्या सुगम पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून जिल्ह्यातील सर्व उत्पादकांनी ही नोंदणी करावी,असे आवाहन  सहायक आयुक्त (औषधे) वि.द. सुलोचने यांनी केले आहे.

            यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१७ पुर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर नियंत्रण, औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत केले जात होते. मात्र अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती. सन २०१७ मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ पारीत केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्याऱ्याच वेगवेगळया उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे अ,ब,क,ड अशी वर्गवारी केली आहे. त्यात अ व ब या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि क व ड या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.

            वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दिनांक ११.०२.२०२० रोजीच्या अधिसूचनेव्दारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या सुगम पोर्टल www.cdscomdonline.gov.in या संगणक प्रणालीवर ऐच्छीक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी ही १८ महिन्यांच्या आत म्हणजे ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करणे अपेक्षीत होते. त्यानंतर एक वर्षासाठी म्हणजे दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याव्दारे उत्पादीत वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य (Mandatory) केले आहे.

               तरी अकोला जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांना अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, अकोला व्दारे आवाहन करण्यात येते की, ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहित मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्याविरुध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे सहायक आयुक्त (औषधे) वि.द. सुलोचने यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ