स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव;जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा: अभ्यास, निरीक्षण आणि शैली हीच वक्तृत्वाची गुरुकिल्ली-संजय खडसे: विशाल नंदागवळी प्रथम तर गायत्री देशमुख द्वितीय

 






 अकोला, दि.१८(जिमाका)- विविध विषयांचा अभ्यास, त्यासंदर्भात केलेले आकलन – निरीक्षण आणि अभ्यासलेले सादर करण्याची शैली, हीच उत्तम वक्तृत्वाची गुरुकिल्ली आहे,असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.

येथील लोकशाही सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विशाल नंदाराज  याने प्रथम तर गायत्री देशमुख हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

यास्पर्धेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे  गजानन महल्ले, रासेयो समन्वयक प्रा. डॉ. संजय तिडके आदी उपस्थित होते. स्पर्धा संपल्यावर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत  विविध महाविद्यालयातून निवडक ११ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यांनी आज आपले सादरीकरण केले.  प्रा. डॉ. संजय तिडके यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. तर प्रा. डॉ. संजय पोहरे. प्रा. स्वप्निल इंगोले, सुमित जोशी, शिवाजी भोसले यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पाहिली.

 या स्पर्धेसाठी स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची वाटचाल, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत,  लोकशाही टिकविण्यासाठी युवकांची भुमिका,  स्वातंत्र्य आणि आजची समाजस्थिती, जागतिकीकरणातील  भारतासमोरील विविध आव्हाने असे विषय देण्यात आले होते.

या स्पर्धेत  प्रथम क्रमांक  विशाल नंदागवळी,  द्वितीय गायत्री देशमुख, तृतीय  नागसेन अंभोरे , चतुर्थ खुशी खत्री, पाचवा क्रमांक आदित्य टोळे यांनी मिळविला. विजेत्यांना पारितोषिक तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र विशेष समारंभात वितरित केले जाणार आहेत. परीक्षकांच्या वतीने शिवाजी भोसले यांनी निकालांची घोषणा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन महल्ले यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालय प्रतिनिधी रोहन बुंदेले  यांनी तर प्रा. डॉ. तिडके यांनी आभार मानले. या आयोजनासाठी इशा मसरे, वैभव चोपडे, वैष्णवी टिकार या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ