प्रेमः माणसा माणसा कधी होशील माणूस?




अकोला, दि.13(डॉ.मिलिंद दुसाने)- प्रेम ही खरेतर निसर्गदत्त भावना. सर्व प्राणिमात्रांच्या ठायी ती असतेच असते. मात्र प्रेमाचे विकृत हिंसक रुप हे माणसाखेरीज कोणत्याही प्राण्यात वा पक्ष्यात दिसून येत नाही. या उद्दात्त प्रेम भावनेचा अंगिकार करुन माणुस कधी माणुस होणार? हा कवयित्री बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित होतो.

            एकंदर निसर्गाचे अवलोकन केल्यास माणसांपेक्षा पक्षी हे निश्चितच उत्कट आणि नैसर्गिक प्रेम करतात, समर्पण शिकावं तर ते पक्ष्यांकडूनच; हे ठळकपणे अधोरेखित होते.अकोल्याचे पक्षी अभ्यासक रवी धोंगळे यांनी याबाबत आपली काही निरीक्षणं नोंदवलीत. ती जागतिक प्रेम दिनानिमित्त साऱ्यांच्या अवलोकनासाठी...

सुगरण पक्षांचा अत्यंत कलाकुसरीने विणलेला खोपा माळरानात दिसून येतो. प्रत्यक्षात हा खोपा नर पक्षी बांधत असतो. विशेष म्हणजे आपल्या मादीला खूष करण्यासाठी तो जिवापाड ही मेहनत घेत असतो. कुशल कलाकुसरयुक्त आणि सुरक्षित खोपा असेल तरच मादी त्याच्या प्रेमप्रस्तावाला  होकार देते. जर तिला तो खोपा आवडला नाही तर ती त्याला नकार देऊन निघून जाते. थोडक्यात असे, अर्धवट वा रिकामे खोपे हे अशा उध्वस्थ प्रेमाची निशाणी असते. उध्वस्थ प्रेमाचे प्रतिक असले तरीही ते देखणे असते हे विशेष. प्रेम नाकारलं म्हणून माणसांसारखे ते घर-कुटुंब उध्वस्थ करत नाहीत, की तिने नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला ही करत नाही. हे सगळं माणसांत. म्हणूनच प्रेम नकारातून हिंसेच्या घटना मानवी समाजात घडतात, पक्षांमध्ये नाही.

जे नवखे सुगरण नर असतात, ते आपल्या सिनियर नराचे घरटे बांधकाम बघून, निरीक्षण करुन  आपला पहिला प्रयत्न सुरु करतात. त्यातले अनेक अपयशी ठरतात. ती घरटी अर्धवट सोडतात. पुढच्या हंगामात पुन्हा नेटाने प्रयत्न करतात, आणि आपलं घरटं साकारुन आपल्या प्रियतमेला रिझवतात. सुगरण पक्षाला ज्या पद्धतीचे घरटे विणायचे असते त्यासाठी आवश्यक  लवचिक गवत जुलै महिन्यानंतर उपलब्ध होते, त्यावेळी ते घरटे बांधावयास सुरुवात करतात आणि  सुमारे महिनाभरात बांधून पूर्ण करतात. हे काम पूर्ण होता होता मादीचा होकार आला तर ती ही त्याला प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देत असते. तिला तो खोपा पसंद आला तर मग हक्काने जाऊन आतली अंडी घालण्याची व उबविण्याची जागा स्वतःला हवी तशी नीटनेटकी करुन घेते. थोडक्यात इंटेरियर तिच्या चॉईसचं असतं.

तिच गोष्ट धनेश पक्षाची. झाडांच्या खोल ढोलीची निवड करुन त्यात ह्या पक्षाची मादी अंडी देते. त्यांना सुरक्षा म्हणून हा नर ढोलीचे तोंड चिखलाच्या कवचाने बुजवतो. केवळ चोच आत जाईल इतकी जागा मोकळी ठेवतो. पिले पूर्ण सक्षम होऊन उडण्यालायक होत नाहीत तोवर मादी व पिलांना एकटा अन्न पुरवतो. त्याची ही धावपळ सुरुच असते.  पिलं मोठी झाल्यावर हे कवच फोडून त्यांना बाहेर आणतो. गायबगळ्याचाही नरपक्षी आपली मादी व पिलांना अशाच पद्धतीने एकटा अन्न भरवतो.

एरवी आपल्याला राघु मैना ही पक्षांची जोडी माहिती असतेच. मोरांनाही आपल्या मादीला रिझवण्यासाठी पिसारा फुलवून तिची संमती घ्यावी लागते. कोकिळेचा गोड आवाज असे आपण म्हणत असलो तरी तो नर कोकिळ पक्षाचा आवाज असतो. सगळ्यात विशेष असते ती सारस पक्षाची प्रेम कहाणी. एकदा आपला जोडीदार निवडल्यानंतर ते जोडीदार कधीच बदलत नाही. एकाचा मृत्यू झाला तर जोडीदार पुढचं आयुष्य एकट्यानेच जगतो... मरेपर्यंत!

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आणि आमचं सेम असतं’, असे मंगेश पाडगावकरांनी म्हटलं आहे खरं, पण ते त्यांनी माणसांच्या प्रेमाबाबत म्हटलं असावं. मात्र, प्रेम म्हटलं तर माणसांचं आणि पक्षांचं मात्र सेम नसतं, असंच म्हणावं लागेल.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ