कोविडमुळे मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान; मनपा आरोग्य विभागाच्या पडताळणीत ७० जणांचे अर्ज पात्र

 


अकोला दि.२३(जिमाका)- कोविड १९ आजारामुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते.यासाठी अकोला मनपा क्षेत्रातून  ऑनलाईन वेब पोर्टलवर १५५ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. मनपाच्या तक्रारनिवारण समितीने आठवडाभरात या अर्जांची पडताळणी करुन अर्जदारांसमक्ष अपिल सुनावणी घेऊन ७० जणांचे अर्ज पात्र ठरविल्याची नोंद ऑनलाईन करण्यात आली आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या पत्रकानुसार, कोविड मुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज करता यावा यासाठी ऑनलाईन पोर्टल (mahacovid19relief.in https://epassmsdma.mahit.org/login.htm )  विकसित केले होते. या पोर्टलवर अर्जदारांमार्फत माहिती भरण्यात आली. तथापि, अकोला मनपा क्षेत्रातील १५५ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. ते सर्व जण अपिलात गेले होते. शासनाच्या निर्देशानुसार, या अपिलांवर मनपा स्तरावर तक्रार निवार समिती गठीत करुन सुनावणी घेण्यात आली व अर्जदारांच्या त्रुट्या दुरुस्त करुन घेण्यात आल्या. ही सुनावणी दि.१५ ते २३ या दरम्यान घेण्यात आली. या सुनावणीत १३० जणांना पाचारण करण्यात आले. त्यापैकी ८५ जण उपस्थित होते. या सगळ्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी करुन सोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. सर्व कागदपत्रे अर्जदारांसमोर ऑनलाईन पोर्टलवर अद्यावत करण्यात येऊन ते पात्र असल्याबाबत माहिती पाठविण्यात आली. त्यामुळे आता या ७० जणांना लाभ मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. अकोला मनपास्तरीय  तक्रार निवारण समितीत अध्यक्ष डॉ. फारुख शेख, डॉ. प्रभाकर मुदगल, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मो. मुस्लेहुद्दीन शेख, डॉ. अजमल खान, शरद डोंगरे, निर्मला वानखडे यांचा समावेश असून त्यांनी ही पडताळणी केली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ