कापूस खरेदी केंद्रावर कमाल वाहन संख्या मर्यादा हटवली-सीसीआयचे निर्देश


अकोला,दि.१९(जिमाका)-  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन कालावधीत सीसीआयच्या कापूसखरेदी केंद्रांवर खरेदी करण्यासाठी  एका बाजारसमिती केंद्रावर  ३० ते ४० शेतकऱ्यांनाच टोकन देण्याचे निर्देश होते. तथापि कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची झालेली नोंदणी आणि  अद्याप खरेदी व्हावयाचा कापूस लक्षात घेता आता ही वाहन संख्येची मर्यादा हटविण्यात आली आहे, असे निर्देश सीसीआयच्या नवी मुंबई येथिल मुख्यालयाने दिले आहेत. तथापि ही मर्यादा हटविण्यात आली असली तरी कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊनच खरेदी प्रक्रिया करावयाची आहे,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सीसीआय च्या नवी मुंबई येथील  मुख्यालयाकडे पाठपुरावा केला होता.
हे निर्देश सीसीआयच्या अकोला येथील केंद्रासह देशातील अन्य केंद्रांनाही पाठविण्यात आले असून  त्यात म्हटले आहे की,  सीसीआयच्या वाणिज्यिक कार्यालयांनी  स्थानिक पातळीवर कृषि उत्पन्न बाजार समित्यांना वाहन संख्या मर्यादा काढून टाकण्यात आली आहे,असे कळवावे. जेणे करुन अधिक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता येणे शक्य होईल. ही खरेदी प्रक्रिया राबवितांना मात्र कोरोनसंसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावयाच्या आहेत, असेही सीसीआयचे मुख्य व्यवस्थापक (विपणन)  एस. के. पाणिग्रही यांनी कळविले आहे.
पालकमंत्र्यांकडून स्वागत
या संदर्भात, सीसीआय कडून आलेले हे निर्देश म्हणजे,अकोला जिल्ह्यातील कापुस विक्रीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बाब  आहे. कापुस खरेदी प्रक्रियेला वेग येईल व पावसाळ्याच्या आत खरेदी पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री   ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
कापूस खरेदीस असहकार्य करणाऱ्यांविरुद्ध
कारवाई करण्याचे पणन संचालकांचे निर्देश
कापूस खरेदी कामी काही जिनिंग प्रेसिंग युनिट धारक कापूस पणन महासंघ व सीसीआय यांना सहकार्य करीत नसल्याने तसेच काही किरकोळ कारणाने काम बंद ठेवत आहेत, यासंदर्भात कापूस खरेदीचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे,असे निर्देश राज्याच पणन संचालक यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.
त्यांनी म्हटले आहे की-
.असहकार्य करीत असलेल्या जिनिंग प्रेसिंग युनिट हे सहकारी संस्थांच्या मालकिचे असल्यास संबंधित निबंधकांनी तातडीने संस्थेविरोधात उचित कायदेशीर कारवाई सुरू करावी.
. जिनिंग प्रेसिंग युनिट धारक पणन विभागाचे dml licencee किंवा private market licencee असल्यास जिल्हा ऊपनिबंधक यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन आवश्यकते प्रमाणे कारवाईचा प्रस्ताव पणन संचालनालयास पाठवावा
. खाजगी जिनिंग प्रेसिंग युनिट धारक असहकार्य करित असल्यास त्यांचेकडील बाजार समितीचे खरेदीचे लायसन्स रद्द करणे बाबत जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने बाजार समितीला सुचित करावे. व इतर औद्योगिक लायसन्स रद्द करणेबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कापूस खरेदी प्रक्रियेबाबत सद्यस्थिती-
अकोला जिल्ह्यात एकूण नऊ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु आहेत. त्यात सात केंद्र ही सीसीआय ची असून  कापूस फेडरेशनची  दोन केंद्र आहेत. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांशी १९ जिनिंग प्रेसिंग युनिट संलग्न आहेत. तर  फेडरेशनच्या कापूस खरेदी केंद्राशी तीन जिनिंग प्रेसिंग युनिट संलग्न आहेत. लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील सर्व कापुस खरेदी केंद्र सुरु असून  जिनिंग प्रेसिंग  पूर्ण सुरु झालेले नाहीत. सीसीआय अंतर्गत १९ जिनिंग प्रेसिंग युनिट असल्याने  केवळ सहा ग्रेडर उपलब्ध अस्ल्याने  अडचण निर्माण होत आहेत. सीसी आय मार्फत लॉकडाऊन काळात  २८८० शेतकऱ्यांकडून  ८१ हजार ५८४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर फेडरेशनमार्फत ८९३ शेतकऱ्यांकडून २५ हजार ८४९ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. अद्याप जिल्ह्यात सीसीआय केंद्रांवर १९ हजार शेतकरी तर फेडरेशन केंद्रांवर  २५४० असे एकूण २२ हजार ५०० शेतकरी  प्रतिक्षेत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी दिली आहे.
००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ