शेतकरी गटांचे‘जय किसान’:आठ कोटी रुपयांच्या निविष्ठा थेट बांधावर: शेतकऱ्यांनी घरपोच सेवेचा लाभ घ्यावा- पालकमंत्री ना. कडू यांचे आवाहन


अकोला,दि.१६(जिमाका)-  जिल्ह्यात कोराना संसर्गाच्या आपत्तीकाळात तब्बल १८९ शेतकरी गटांनी ‘जय किसान’ हा नारा बुलंद करत शेतकरी गटांची चळवळ बुलंद केली आहे. आतापर्यंत या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी लागणारे तब्बल आठ कोटी १४ लाख ६५ हजार पाच हजार ५७० रुपये किमतीच्या कृषि निविष्ठा (खते, बि बियाणे)   शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच केल्या आहेत. आपत्तीत शोधलेला हा एक मार्ग असला तरी ही चळवळ अधिक बलिष्ठ होऊन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली शेतकऱ्यांची साखळी अधिक बळकट व्हावी. या सेवेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
शेतकरी हा जगाचा पोषिंदा आहे. लॉक डाऊनच्या काळात सर्व व्यवहार नियंत्रित असतांना शेतकरी मात्र पुढच्या हंगामाच्या तयारीला आतापासून लागला आहे. नैसर्गिक आपत्ती त्यात कोरोनासारखे संक्रमणाचे संकट असतांनाही शेतकरी अन्न धान्य पिकवण्याच्या तयारीत कुठेही कमी नाही. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्याचीही आगेकूच सुरु आहे. आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा खरेदीसाठी तालुक्याला वा शहरात यावे लागू नये, येथील लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या संचारबंदीचा भंग होऊ नये, कोरोना संक्रमणाचा धोका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा ह्या थेट शेताच्या बांधावर पोहोचवाव्या असे धोरण आखून दिले.  याचा उद्देश एकच शारीरिक अंतर राखले जाऊन कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालणे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिल्यानुसार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी शेतकरी गटांचा यात अंतर्भाव केला. आत्मा प्रकल्पाअंतर्गत नोंदणी झालेले  शेतकरी गट म्हणजे गावातील शेतकऱ्याचा थेट संपर्क असलेली यंत्रणा. याच यंत्रणेला दिशा देऊन कृषि निविष्ठा पोहोच करण्याचे काम देण्यात आले.
शेतकरी गटांची महत्त्वाची भूमिका
शेतकऱ्याने आपल्या गावातील आपल्याशी संबंधित गटाकडे आपल्याला लागणाऱ्या बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी नोंदवायची. त्यानुसार त्या त्या शेतकरी गटाने तालुक्याला वा शहरात येऊन  होलसेल दराने खरेदी करायची. आणि मग हा माल शेतकऱ्याच्या घरा-बांधापर्यंत पोहोचवून द्यायचा. होणारी रक्कम ही शेतकरी गटाकडे व गटाने विक्रेत्याकडे द्यायची.
४३३१ शेतकऱ्यांचा सहभाग
या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या तब्बल १८९ गटांनी सहभाग दिला. त्यात सर्व तालुके मिळून १०२६.०६ मेट्रीक टन  खते तर ८१९४.३२ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहे. खतांची किंमत  दोन कोटी  आठ हजार १७० रुपये इतकी असून  बियाण्यांची किंमत  सहा कोटी  १४ लाख ५७ हजार ४०० रुपये इतकी आहे. या सर्व प्रक्रियेत ४३३१ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून घरपोच सेवेचा लाभ घेतला आहे.
पालकमंत्र्यांचे आवाहन
यासंदर्भात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांनी शेतकरी गटांमार्फत भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून या आपत्तीत चांगली कामगिरी केली. त्यातूनच शेतकरी ते ग्राहक ही थेट साखळी अकोला जिल्ह्यात विकसित झाली आहे. त्याच धर्तीवर शासनाच्या निर्देशानुसार, कृषि निविष्ठाही थेट शेताच्या बांधावर पोहोचविण्यात येत आहेत. त्यासाठी शेतकरी गटांच्या साखळीचा उत्तम वापर करता येईल. तरी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील शेतकरी गटाकडे आपली खते, बियाणे, किटकनाशके यांची मागणी नोंदवावी. यातून आपल्याला खात्रीशीर कृषि निविष्ठा थेट घरपोच व वाजवी दरात मिळतील. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. कडू यांनी केले आहे.तसेच शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या निविष्ठांचे पक्के बिल, पैसे दिल्याची पावती व पाकीट, वेष्टन, पॅकिंग इ. हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. असेही आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ