प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना घरपोच धान्य द्या- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला,दि.१३(जिमाका)-  महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या  भागांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या भागातील नागरिकांचे घराबाहेर पडण्याची कारणे शोधून त्या सुविधा पुरवावी. त्याच अनुषंगाने तेथे सर्व शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदारामार्फत  घरपोच धान्य पोहोचवा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.
अकोला जिल्ह्यातील कोरोना फैलावाला आळा घालण्यासाठी  उपाययोजना निश्चित करुन ॲक्शन प्लॅन तयार करण्यासंदर्भात आज  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी  बी.के.काळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम,
यावेळी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक स्नेहा सराफ, महिला व बालविकास अधिकारी योगेश जवादे  तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी पालकमंत्री म्हणाले की, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निर्धारीत झालेले शहराचे भाग हे  दाट लोकवस्तीचे आहेत. तेथून नागरिकांनी घराबाहेर पडणे योग्य नाही. मात्र या ठिकाणी बहुतांश गोरगरीब लोक रहात असल्याने त्यांना दैनंदिन अन्न धान्य खरेदीसाठी बाहेर पडावे लागू नये यासाठी त्यांना रेशनदुकानदाराने  घरपोच धान्य पोहोचवावे, अशी सुचना पालकमंत्र्यांनी केली. ज्या लोकांना जेवणाची सोय नसेल त्यांनाही घरपोच शिवभोजन थाळी देण्याचा उपक्रम सुरु करावा, असेही त्यांनी सांगितले.
 लोकांना घरपोच धान्य पोहोचविण्यासाठी लोकांना लाऊडस्पिकरद्वारे सुचना कराव्या. त्यात देण्यात येणारे परिमाण, आकारण्यात येणारे दर,  धान्य पोहोचविण्यासाठी लागणारा कालावधी याबाबत लोकांना माहिती द्यावी.  प्रतिबंधित क्षेत्रातील डॉक्टर्सना सुरक्षा साधने पुरवून दवाखाने सुरु करण्याबाबत सुचना त्यांनी केली. तसेच दोन फिरते आरोग्य पथक व दोन रुग्णवाहिका प्रतिबंधित क्षेत्रासाठी  कार्यरत ठेवावेत.  प्रत्येक घरातील एका सक्रिय सदस्याची (जो कौटूंबिक कामांनिमित्त घराबाहेर जातो)  तपासणी करावी. आणि ही तपासणी घरी जाऊन करावी. डॉक्टर आपल्या दारी, तपासणी आपल्या घरी  या पद्धतीने उपक्रम राबवावा.
प्रतिबंधित क्षेत्रातील सफाईची कामे व पाणी,  विद्युत पुरवठा सुरळीत राखण्याकडे विशेष लक्ष द्यावे. या भागातील व्यक्ती कोणत्याही कामासाठी बाहेर जाता कामा नये यासाठी उपाययोजना करा. अत्यावश्यक सेवेसाठी नेमेलेल्या कर्मचारी , व्यक्ती यांच्या जाण्या येण्याची नोंद ठेवावी. सर्व सेवांच्या सुसूत्रिकरणासाठी नोडल अधिकारी नेमुन त्याचे संनियंत्रण करावे, असेही ना. कडू यांनी सांगितले.
याशिवाय मुंबई, पुणे येथून तसेच नागपूर, औरंगाबाद यासारख्या रेड झोन मधील जिल्ह्यातून अकोल्यात परतणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी काटेकोरपणे करुन त्यांना अलगीकरणात वा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  उपचाराची सुविधा वा गृह अलगीकरण करणेयाबाबत सर्व सज्जता करणे अपेक्षित आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांत तयारी पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. या लोकांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचीही सुचना त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद जिचकार यांना केली.
तसेच आलेल्या व्यक्तींची रुग्णालयात होणारी तपासणी, त्यानंतर उपचारासाठी दाखल होणे, रुग्णाला आयसोलेशन वार्डात ठेवणे याबाबतचे नियोजन तयार करुन त्याप्रमाणे उपचार सुविधा पुरविण्यात याव्यात असे निर्देश दिले. तसेच  ग्रामिण  तसेच शहरी भागात बाहेर गावाहून  आलेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीमानानुसार त्यांचेवर उपचार तर होतीलच शिवाय  त्यांना घरी अलगीकरणात ठेवायचे असेल तर प्रत्येक जणाच्या स्वतंत्र संपर्कासाठी एका कर्मचाऱ्यास २० व्यक्तिंशी दररोज फॉलोअप घेण्याचे काम सोपवावे असेही त्यांनी सुचविले. तसेच जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथिल उपचार सुविधा, चाचणी  व अहवाल कामी  लागणारे मनुष्यबळ उपलब्धता, आवश्यक साधनसामुग्री याबाबत आढावा घेऊन त्यांनी आवश्यकता भासल्यास आणखी निधी आणून  साहित्य व औषधे पुरवठा केला जाईल याबाबत आश्वस्त केले.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ