प्रतिबंधित क्षेत्र व प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला,दि.२१ (जिमाका)-  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालत असतांना  निर्धारित केलेले प्रतिबंधित क्षेत्रातील ये-जा थांबविणे व मुंबई पुण्यासारख्या ठिकाणाहून गावाकडे आलेल्या प्रवाशांच्या आरोग्य तपासणी करुन त्यांचे अलगीकरण करण्याच्या उपाययोजना करणे यावर लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले. यावेळी आ. नितीन देशमुख यांचीही उपस्थिती होती.
अकोला शहरातील विविध भागात कोरोना  प्रादुर्भावाबाबत आज झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामसुंदर शिरसाम,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार उपस्थित होते.
यावेळी ना. कडू म्हणाले की, प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेरील क्षेत्रात होणारी ये जा पूर्णतः थांबवावी. तसेच प्रादुर्भाव असलेल्या भागातून प्रादुर्भाव नसलेल्या भागातील मानवी संपर्कही टाळावे. त्यासाठी अकोला शहरातून ग्रामीण भागात अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी  आपल्या कामाच्या ठिकाणी ये जा करु नये.  तसेच एखादा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याची तात्काळ चौकशी करुन त्याच्या संपर्कांची तपासणी गतिमानतेने करुन त्याच्या निकटवर्तियांना व संपर्कातील व्यक्तींना चाचणीसाठी आणून तपासणी केली पाहिजे, प्रतिबंधित क्षेत्रातील सुरक्षा अधिक कडक करा. कोणीही बाहेरुन आत व आतून बाहेर ये जा करता कामा नये. या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासाठीची व्यवस्थाही नियंत्रित ठेवावी. पावसाळ्यात अन्य साथीचे आजार लक्षात घेता आगामी पावसाळ्यात  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० बेडस ची अतिरिक्त व्यवस्था ठेवावी. संक्रमण थांबविणे आणि मृत्यूदर कमी करणे यासाठी  प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ