पायपीट थांबली आणि एका रात्रीत आपल्या राज्यात पोहोचलेही;अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे ४२ मजूरांना छत्तीसगड सिमेपर्यंत मोफत प्रवास


अकोला,दि.११ (जिमाका)-  शेकडो किलोमिटर्सची गेला आठवडाभराची पायपीट.... काही कर्तव्यदक्ष सहृदय अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडते.. अधिकाऱ्यांमधील संवेदनशील माणसाला माणूसकीचा पाझर फुटून वेदना जागते आणि एका क्षणात पायपीट तर थांबतेच शिवाय प्रवासाची सोय होऊन ते एका रात्रीत आपल्या राज्यात पोहोचतात ही. अधिकाऱ्यांची दक्षता, सहृदयता आणि कर्तव्यपरायणता यामुळे छत्तीसगडच्या ४२ मजूरांची पायपीट तर थांबलीच शिवाय मोफत प्रवासाची सोय होऊन त्यांना थेट त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत एका रात्रीत पोहोचलेही.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रिधोरा बाळापूर दरम्यान काल (रविवार दि.१०) परिवहन विभागाचा फ्लाईंग स्क्वाड (वायुवेग पथक)  कार्यरत होते. त्यावेळी सकाळी ११ ते साडेअकराच्या दरम्यान त्यांना  पायी जाणारे काही मजूर दृष्टीस पडले. या पथकातील अधिकाऱ्यांनी आपली वाहने थांबवून त्यांची विचारपूस केली.  हे मजूर भिवंडीहून चालत येत होते. ते तब्बल ४२ जण होते. त्यात महिला, लहान मुलं ही होती.
परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने या सर्व मजूरांना अकोल्यात आणलं. त्यांच्या पैकी अनेक जण उपाशी होते. त्यांना अकोला येथे बसस्थानकावर नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान...परिवहन विभागाने व महसूल विभागाने तात्काळ पत्रव्यवहार करुन आवश्यक मंजूरी मिळविल्या. या मजूरांना रात्री आठ वाजेच्या सुमारास एस.टी.महामंडळाच्या दोन बसेस मध्ये बसवून छत्तीसगड हद्दीतील राजनंदगाव पर्यंत म्हणजे महाराष्ट्र सिमेवर देवडी या गावापर्यंत सोडण्यासाठी पाठविण्यात आले.
 यासंदर्भात छत्तीसगड प्रशासनाशीही संपर्क करण्यात आला होता. त्यांचे अधिकारी व त्यांच्या बसेस त्या सिमेवर येणार होत्या. त्याची  खातरजमा केल्यावर या गाड्या काल (रविवार दि.१०) रात्री आठ वाजता अकोला इथून रवाना झाल्या. आता त्यांचा प्रवास विनामूल्य होऊ शकणार होता. कारण शासनाने घेतलेला निर्णय. शासनाने दि. ९ रोजीच निर्णय घेऊन  परप्रांतातील मजूरांना तसेच राज्यांतर्गत स्थलांतरीत मजूरांना आपापल्या गावी परतण्यासाठी  विनाशुल्क प्रवास करण्यास मान्यता दिली होती. त्या निर्णयाचा लाभ झाला आणि या मजूरांची पायपीट थांबली... एका रात्रीत ते त्यांच्या राज्यात पोहोचलेही.
अकोल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सहाय्यक परिवहन अधिकारी वरोकार यांच्या मार्गदर्शनात फ्लाईंग स्क्वाड चे  मोटार वाहन निरीक्षक वसईकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नेवरे, वाहनचालक पप्पू यांनी तत्परतेने आणि सहानुभूतिने मजूरांची दखल घेऊन कार्यवाही केली. त्यांच्या  कार्यतपरतेला तितक्याच तत्परतेने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसिलदार  विजय लोखंडे तसेच एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी या साऱ्यांनी  प्रतिसाद देत दाखवलेल्या सहृदयतेमुळे या मजूरांची ही पायपीट थांबली. हे सर्व अधिकारी त्या मजूरांना निरोप देण्यासाठी अकोला बसस्थानकावर काल रात्री उपस्थित होते. त्यावेळी पाऊसही पडत होता.
 त्या मजूरांचा प्रवास पूर्ण झाला आज (सोमवार दि.११) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते मजूर त्यांच्या राज्याच्या सिमेत पोहोचले सुद्धा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ