प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधांचे मोफत वितरण-प्रशासनासोबतच्या बैठकीत निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतूक


अकोला,दि.२० (जिमाका)- नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी कोरोना प्रादुर्भाव जास्त असलेल्या क्षेत्रात तसेच अन्य भागातही  होमिओपॅथी औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टर्सच्या जिल्हाप्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टर्स हे औषध मोफत उपलब्ध करुन देतील तर जिल्हा प्रशासन व मनपाची यंत्रणा या औषधांचे वितरण घरोघरी करेल. हा सर्व उपक्रम रेडक्रॉस या संस्थेच्या अंतर्गत राबविण्यात येईल. होमिओपॅथी डॉक्टर्सने घेतलेल्या पुढाकाराचे जिल्हाधिकारी पापळकर यांनी कौतुक केले आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांची उपस्थिती होती तर होमिओपॅथ मेडीकल कॉलेजचे  प्राचार्य डॉ. किशोर मालोकार,  डॉ. संदीप चव्हाण, डॉ. उदय नाईक,  डॉ. नरेश गोंड, डॉ. शिवशंकर मौर्य,  डॉ. रामभाऊ धोटे, डॉ. प्रविण अग्रवाल, डॉ.  महेश कुलकर्णी,  डॉ. अमोल कुचर, डॉ. साजिद  देशमुख,डॉ, कल्पना धोटे,  डॉ. जेबा सुलताना, डॉ. आफरीन हयात, डॉ. आरती गोएंका, डॉ. कपिल भटी व अन्य डॉक्टर्स उपस्थित होते.
अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना तसेच  अन्य भागातील नागरिकांना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी  होमिओपॅथी मधील आर्सेनिक अल्बम ३० हे औषध सर्व डॉक्टर्स मोफत उपलब्ध करुन देतील, ते औषध रेडक्रॉस व प्रशासनाच्या यंत्रणेमार्फत वितरीत केले जाईल.  हे औषध भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले औषध आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयाने दिलेल्या सुचनांप्रमाणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. या औषधांसंदर्भात औषध सेवनाबाबत सर्व सुचना डॉक्टर्स देतील.  रेडक्रॉस मार्फत तसेच कम्युनिटी क्लिनिक मधून वितरण केले जाईल.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टर्सने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी घेतलेला हा पुढाकार वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या या उपक्रमाला केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनिहाय प्रशासन सहकार्य करेल. त्यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य केले जाईल.  हे काम करतांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सुचना व निर्देशांचे काटेकोरपालन केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सहभागी डॉक्टर्सने यावेळी आपली मते व्यक्त केली व शहरासाठी आपले योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनीही आपली मते व्यक्त करुन उपस्थित डॉक्टर्सचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ