जिल्हाधिकारी पापळकर यांनी घेतली तातडीची आढावा बैठक


अकोला दिनांक २७(जिमाका)-  जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सायंकाळी उशीरा तातडीने आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यात उद्या(गुरुवार दि.२८)पासून  शहरात सुरु होणाऱ्या आरोग्य सर्वेक्षणात आढळणारे उच्च धोका पातळीतील तसेच संदिग्ध वाटणारे रुग्णांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
                        यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त  संजय कापडणीस,  शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
                        रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला  शहरात मनपा हद्दीत  आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तपासणीत जे व्यक्ती संदिग्ध वा उच्च धोकापातळीत  आढळतील त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात असलेल्या संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात  येईल. त्यासाठी  तेथील ६५०  बेडच्या क्षमतेचा वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.  या व्यक्तिंना तेथेच निरीक्षणात ठेवून जर लक्षणे आढळली तर तेथेच व्यवस्था करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासले जातील. जर नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले जाईल. आणि अहवाल निगेटीव्ह आल्यास त्या व्यक्तीस घरी गृह अलगीकरणात ठेवण्यात येईल.  ही संस्थागत अलगीकरणाची व्यवस्था  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वसतीगृह व अन्य इमारतींमध्ये सद्यस्थितीत आहेच. सध्या तेथे ६५० बेडची व्यवस्था आहे, या क्षमतेचा वापर करुन ही उपाययोजना राबवावी,  तसेच उद्या ( गुरुवार दि.२८) पासून मनपा हद्दीत प्रत्येक घरी प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येईल. त्याची सुरुवात प्रतिबंधित क्षेत्रांपासून करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. सध्या भरतीया रुग्णालयात सुरु असलेले घशातील स्त्रावांचे नमुना संकलन केंद्र हे संस्थागत अलगीकरणाच्या ठिकाणी म्हणजेच पीकेव्ही येथे स्थलांतरीत करावे, असेही निर्देश देण्यात आले.
भरतीया रुग्णालयातील नमुने संकलन केंद्राचे पीकेव्हीत स्थलांतर
दरम्यान पीकेव्हीत संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या संदिग्ध वा जोखमीच्या व्यक्तींचे घशातील स्त्रावांचे कोरोना विषाणू चाचणी करिता संकलन करता यावे यासाठी भरतीया रुग्णालयात सुरु केलेले स्त्राव नमुना संकलन केंद्र आता पीकेव्हीत स्थलांतरीत करण्यात येऊन तेथे कार्यान्वित करण्यात येत आहे, ही कारवाई उद्याच पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ