कृषि विभागाकडून प्राप्त कृषि सल्ला :सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी


        सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊनची स्थिती 17 मे पर्यंत केंद्र  व राज्य  शासनाने घोषित  केलेली आहे. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये खरीप हंगाम सन 2020-21 च्या अनुषंगाने शेतकरी बांधवाना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. 
                 आपल्याकडे जे काही चांगले सोयाबीन शिल्लक  आहे, या  सोयाबीनचा आपण बियाणे म्हणून  वापर करू शकतो आणि हे करत असतांना घरच्या घरी सोयाबीन बियाण्याची  उगवण क्षमता कशी तपासावी?  याचा वापर कसा करावा? या अनुषंगाने आपण काही काळजी  घ्यावी.
                 बंधुनो, आपल्या  घरी सोयाबीन  पोत्यामध्ये ठेवले असेल तर पोत्यात खोलवर हात घालून मुठभर  सोयाबीन बाहेर काढा, असे तीन-चार पोत्यामधून काढलेले सोयाबीन एकत्र करा.   आपल्या घरच्या  गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे करा. ते स्वच्छ धुवून घ्या. एक  तुकडा जमिनीवर पसरवा.  त्यावर पोत्यामधून काढलेले 100  सोयाबीनचे दाणे  दिड ते दोन  से.मी. अंतरावर  10-10 च्या रांगेत आपल्याला ओळीत ठेवायचे आहेत. अशाप्रकारे 100 दाण्यांचे तीन नमुने तयार करावयाचे आहेत. आपण सहा तुकडे  केले आहेत, यापैकी तीन तूकडे (गोणपाटाचे) आपल्याला जमिनीवर पसरवायचे आहेत व त्यावर तीन नमुने आपल्याला तयार करावयाचे आहे. या गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करायचे  व यावर 100 सोयाबीनचे  दाणे टाकल्यानंतर दुसरा जो  गोणपाटाचा तुकडा आहे. तो वरून अंथरायचा आहे. आणि पुन्हा पाणी मारायचा आहे. अशाप्रकारे गोणपाटाच्या तुकड्याच्या तीन गुंडाळी बियाण्यासकट करून आपल्याला ते थंड ठिकाणी सावलीत ठेवायचे आहे. त्यावर अधुन मधुन पाणी शिंपडायचे आहे. सहा ते सात दिवसानंतर ही जी गुंडाळी आहेत. ती पुन्हा जमिनीवर पसरवून यामध्ये चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून ते मोजायचे आहेत. या  तीन गुंडाळीतील सरासरी 100 सोयाबीन  दाण्यापैकी 70 दाण्यात उगवण झाली असेल व  ते रोप जर जोमदार असेल. याचाच अर्थ बियाण्याची उगवण क्षमता 70 टक्के आहे,असे आपण समजावे. हे शिफारसी प्रमाणे आहे. हे बियाणे आपल्याला पेरणी करीता वापरता येते. जर  गोणपाटामधील उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या 70 पेक्षा कमी असेल तर पेरणीच्या वेळी आपल्याला  बियाणे वाढवावावे लागेल व  ते 10 टक्के वाढवायचं आहे. यामुळे आपल्याकडे जे काही चांगले सोयाबीन बियाणे  आहे. ते जपून ठेवा. जर  गोणपाटावरील सोयाबीन बियाणे सरासरी 60 टक्के  पेक्षा कमी  उगवले  असेल तर ते बियाणे पेरणीकरीता वापरू नका.
                  आपण जे तीन नमूने घेतले यामध्ये सरासरी 70 टक्के पेक्षा जास्त उगवण  शक्ती आली तर  या सोयाबीनला  पेरणीपुर्वी  फॉक्झीन 37.5 टक्के अधिक थासरम या बुरशीनाशकाची  3 ग्रॅम प्रति किलो  या प्रमाणात आपल्या बिजप्रक्रीया करायची आहे. बिजप्रक्रीया केल्यामुळे आपले उत्पादन  10 टक्के पर्यंत  वाढते आणि मातीमधुन प्रसारीत होणारे जे काही रोग आहेत, त्याचा प्रचार कमी होतो आणि उत्पन्नामध्ये भर पडते, ही बिजप्रक्रीया  झाल्यानंतर 15 ते  20 मिनिटांनी आपल्याला नत्र-स्थिरीकरण व  स्फुरद  विरघळणे करणारे जीवाणूं यांची आपल्याला बीज प्रक्रीया करावयाची आहे.  याकरीता 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात आपल्याला  रायझोबियम  व स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची बिजप्रक्रीया करायची आहे व पेरणी करावयाची आहे.
                 यामुळे या वर्षाच्या खरीप हंगामामध्ये  आपल्याला  जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुना माझी नम्र  विनंती आहे,  शासनाच्या  वतीने व जिल्हा कृषि विभागाच्या वतीने, की आपणाकडे जे काही  सोयाबीन बियाणे   आहे याची उगवण क्षमता  तपासा व आपल्याला  जी काही  सोयाबीन  पेरणी  करायची आहे, तेच बियाणे वापरा. कारण सोयाबीन बियाणे आपण  तिस-या व चवथ्या फेरी पर्यंत वापरू शकतो. व यामुळे आपला बियाण्यावरील खर्च सुद्धा वाचणार आहे.  सोयाबीन हेक्टरी 70 ते 80 किलो जरी म्हटल तरी आपले  हेक्टरी 7000 ते 8000 रूपये वाचतील व आपला उत्पादन खर्च  या  ठिकाणी कमी होणार आहे.
                 म्हणून आपल्याला पुन्हा एकदा  कळकळीची विनंती आहे की आपल्याकडे जे काही चांगले सोयाबीन आहे त्याची  घरच्या घरी उगवण क्षमता तपासा  व ते बियाणे  म्हणून आपल्या  शेतात वापरा एवढं आवाहन जिल्हा प्रशासन व कृषि विभागाच्या  वतीने करण्यात येत आहे.
                 लॉकडाऊन मध्ये सर्व शेतकरी बांधवानी सामाजिक अंतराचे भान ठेवा, विनाकारण घराबाहेर पडू नका, स्वच्छता पाळा, घरच्यांची काळजी  घ्या  व घरातच राहा.
_ संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ