बाजार समित्या कार्यरत राखून पुरवठा साखळी अबाधित ठेवा -पणन संचालक सुनिल पवार यांचे आवाहन


अकोला,दि.१५(जिमाका)-  कोवीड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरु असणे अपेक्षित आहे. शेतकरी व ग्राहक यांच्या हिताच्या दृष्टीने व कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अबाधित राखणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, असे  आवाहन राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या काळात घ्यावयाच्या दक्षतेबाबत पणन संचालनालयाने वेळोवेळी सुचित केले आहे. प्रसार माध्यमे व इतर यंत्रणा देखील जनजागृती करत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग व इतर उपाययोजना करुन अनेक बाजार समित्यांमध्ये कामकाज सुरु आहे. तथापि काही बाजार समित्या मात्र उपाययोजना न करता  थातूरमातूर कारणे देऊन थेट बाजार आवार बंद ठेवत आहेत किंवा समितीचे कार्यालय सुरु आहे मात्र आवक नाही अशा प्रकारचा अहवाल देत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना शेतकऱ्यांच्या मालविक्रीसाठी बाजार सुरु ठेवणे ही समित्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. कोणतेही ठोस कारणाशिवाय कामकाज बंद करणे ही बाब अत्यंत गंभीर व कर्तव्यात कसूर दर्शविणारी आहे. अशा संकटकाळाट दीर्घकाळ बाजार बंद ठेवल्यास शेतकरी व ग्राहक हे घटक अडचणीत येण्याची शक्यता आहे. शेतमालाचे व्यवहार व वाहतूक सुरु ठेवणेबाबत केंद्र व राज्य शासनाने अत्यंत सुस्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत बाजार समिती संचालक मंडळ व समितीवरील शासन प्रतिनिधी सहाय्यक  उपनिबंधक यांनी स्थनिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा. दिर्घकाळ बाजार बंद ठेवल्याने समित्यांच्या आर्थिकस्थितीवरही विपरीत परिणाम संभवतो. बाजार समितीचे काही घटक बाजार सुरु करण्यास ठोस कारणांशिवाय असहकार्य करीत असल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था करुन कामकाज सुरु करावे. तथापि जेथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत लेखी आदेश प्राप्त असतील तेथे जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांचे सल्ल्याने उचित कार्यवाही करावी. येणारा पावसाळा व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बाजार समितीचे संचालक मंडळ व प्रशासक सर्व घटकासह कोरांना प्रादुर्भाव प्रतिबंधक आवश्यक उपाययोजना करुन नियमित कामकाज सुरु ठेवावे, असे आवाहन राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ