प्रति हेक्टरी किमान दरापेक्षा कमी पीक कर्ज दिल्यास कारवाई-जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे


अकोला दि.३०(जिमाका)-   शासनाच्या सहकार पणन विभागाने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यासाठी प्रति हेक्टरी किमान दर निर्धारीत केले आहेत. त्या दरांपेक्षा शेतकऱ्यांना कमी पीक कर्ज वाटप केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने लागू असलेल्या संचारबंदीच्या मर्यादा बघता जिल्ह्यात खरीप पीककर्ज वितरण अभियान अधिक गतिमान करून ३० जून पर्यंत सर्व पात्र शेतकरी बांधवांना पिक कर्ज वितरण होणे आवश्यक आहे. या मुदतीत गाव पातळीवरील शेतकरी बांधवांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत किमान ६८,८७५ शेतकऱ्यांना ५५१ कोटी रुपये पीककर्ज वाटप करावयाचे आहे.
त्या अनुषंगाने  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत  सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या किमान प्रति हेक्टर /एकर पीक कर्ज वाटप दरापेक्षा कमी दराने पीक कर्ज वाटप करण्यात येवू नये. ही जबाबदारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचे संचालक मंडळ व गटसचिव, सहाय्यक सचिव व लिपिक तसेच कार्यालय सचिव यांची आहे.  त्यानुसार पीक निहाय प्रति एकर कर्जदर याप्रमाणे आहे- कापूस-१७,२०० रु. प्रती एकर, सोयाबीन - ८,००० रु. प्रती एकर, भूईमुंग-१२,८०० रु. प्रती एकर, मिरची- ३०,१०० रु. प्रती एकर, तूर - १२,६०० रु. प्रती एकर, मुग उडीद-७,६०० रु. प्रती एकर, हळद- ४२,२०० रु. प्रती एकर, पपई- २८,००० रु. प्रती एकर.
या किमान पीककर्ज वाटप दरापेक्षा कमी दराने पीककर्ज वाटप करणाऱ्या विविध कार्यकारी संस्था बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांचे संचालक मंडळ व गटसचिव , सहाय्यक सचिव,लिपिक तसेच कार्यालय सचिव यांचेवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ