पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला,दि.१४(जिमाका)-  कोवीडबाधीत  रुग्ण हा मनाने खचलेला असतो.  त्या रुग्णाला  उत्तम उपचार देतांनाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन  सर्वोत्तम सेवा द्या,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.
अकोला जिल्ह्यातील कोरोना फैलावाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी  रुग्णालयाची  पाहणी केली. तसेच  उपचार सुविधांबाबत तसेच कोवीड चाचणी केंद्राबाबत माहिती घेतली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसुले, डॉ. नेताम आणि डॉ. अनिल बात्रा तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  
यावेळी पालकमंत्र्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने उपचार सुविधा व रुग्णांच्या संसर्ग पातळीनुसार करण्यात येणारे वर्गीकरण सांगितले. यावेळी ना. कडू यांनी निर्देश दिले की, रुग्णांना वा संदिग्ध रुग्णांना नेमके कोठे जावयाचे आहे याबाबत उत्तम दिशानिर्देश असलेले फलक दर्शनी भागात लावावे. ‘सर्व उपचार व औषधी हे मोफत आहेत, विकत आणण्याची गरज नाही’ असेही फलक दर्शनी भागात लावावे. उपचार करणारे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांचा ड्युटी चार्ट वेळेआधीच तयार असावा व तो ही दर्शनी भागात लावण्यात यावा. जेणे करुन येणाऱ्या रुग्णाला कोणत्या डॉक्टरांची ड्युटी आहे हे कळायला हवे.  वार्डनिहाय दाखल रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्या.  रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य आवश्यकतांची माहिती यावेळी देण्यात आली. पुढ़ील काळात आवश्यकता भासल्यास आणखी  १२० खाटांची व्यवस्था असलेला वार्ड सज्ज आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
पालकमंत्री म्हणाले की, रुग्णांना सेवा देण्यासाठी  वार्डातील वातावरण स्वच्छ व चांगले ठेवून त्याची मनोवस्था सकारात्मक राहिल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ