विशेष सखोल पुनरीक्षण
‘बीएलओं’ना सहकार्य करा
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन
अकोला, दि. १ : विशेष सखोल
पुनरिक्षण कार्यक्रमात नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांच्या
घरी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ते कागदपत्र जमा करून घेतील व
त्याआधारे मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील. सर्व
संबंधित मतदारांनी कागदपत्रे जमा करण्यास येणाऱ्या मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यास
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
सुनावणीला येण्याची गरज नाही;बीएलओ
घरी येऊन कागदपत्रे जमा करतील
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे दिनांक प्रसिद्धीपत्रक, तसेच पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता, सूचना मतदारांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत. जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणी मध्ये तांत्रिक विसंगती असलेल्या ज्या मतदारांना
सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या असतील व सुनावणीस उपस्थित
राहण्यास सूचित केले असेल तरीही आयोगाच्या सुधारित सुचनांनुसार त्यांना प्रत्यक्ष
सुनावणीस हजर राहण्याची आवश्यकता नाही.
नोटीस प्राप्त झालेल्या
मतदारांच्या घरी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ते कागदपत्र जमा करून घेतील व
त्याआधारे मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील. नोटीस
प्राप्त झालेले मतदार व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा संबंधित बीएलओकडे आवश्यक कागदपत्र/ पुरावे सादर करू शकतील.
तांत्रिक विसंगती असलेल्या
मतदारांकडून केवळ सदर विसंगतीशी संबंधित कागदपत्रे प्राप्त करून घेऊन किंवा बीएलओचा पडताळणी अहवाल/ पंचनामा याद्वारे निर्णय घेण्यात येईल.
केवळ अपवादात्मक प्रकरणी (विहित
कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्राच्या आधारे निर्णय
घेणे शक्य नसल्यास) संबंधित मतदार नोंदणी अधिकारी/ सहायक मतदार नोंदणी अधिकारी
मतदाराची शक्यतो ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेतील. या सुनावणीस संबंधित मतदार किंवा
त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीस हजर राहता येईल.
मतदार नोंदणीसाठी दिनांक ०३, ०४, १० व ११
ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरांमध्ये सुद्धा
नोटीस प्राप्त मतदार आपली कागदपत्रे सादर करू शकतील.
बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील विशेषतः PVTG गटातील व्यक्ती, अनाथ गटातील
मतदार इ. असुरक्षित गटातील मतदारांकरिता विशेष शिबीरे/ मदत कक्ष आयोजित करण्याचे
निर्देश देण्यात आलेले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार मतदार यादीत समावेशापासून वंचित राहणार नाही
याकरिता विशेष काळजी घेण्याचे निर्देश सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात
आलेले आहेत.
पर्याप्त पुरावे उपलब्ध नसलेल्या
किंवा प्राप्त कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसलेल्या प्रकरणी पुढील
कार्यवाही करण्यापूर्वी मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संधी देणे, सुनावणी घेणे व आदेश पारीत करणे ही कार्यवाही करण्यात येईल.
मतदारांशी संपर्क करण्यासाठी व कागदपत्रे जमा करून घेण्यासाठी मतदान
केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) राजकीय
पक्षांच्या मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधींशी समन्वय ठेवतील. सर्व संबंधित
मतदारांनी कागदपत्रे जमा करण्यास येणाऱ्या मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यास (BLO) सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा