अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026

 

 

निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी यंत्रणांनी दक्षतेने कार्य करा

 

-जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश

 

 

अकोला, दि. १९ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ अंतर्गत येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत, अमरावती विभाग मतदारसंघातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या ५ जिल्ह्याच्या क्षेत्रात एकुण ८१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण १३ मतदान केंद्रावर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचे मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांसाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. मतदान सुरळीतरित्या पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणतीही घटना घडू नये, यासाठी संबंधित सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी जबाबदारीपूर्वक दक्षतेने कार्य करावे, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

 

        महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी आज घेतला. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गीता पांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर यांच्यासह महसूल, परिवहन, पोलीस, उर्जा विभागांचे जिल्हा प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

        जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की,   येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रॅम्प, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर तसेच नियमित विद्युत पुरवठा आदी सुविधांची तजवीज ठेवावी. मतदान केंद्रावर वेबकॉस्टींग सुविधा कार्यान्वित करण्यात यावी. आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही, यासाठी फिरते पथकाव्दारे तपासणी करण्यात यावी. २२ ऑक्टोबर रोजी स्ट्राँगरुममधून निवडणूक साहित्य, मतपेट्या व मतपत्रिका मतदान केंद्रावर पोहोचविण्याचे कार्य पोलीस बंदोबस्तात काटेकोरपणे करण्यात यावे.

       

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि निष्पक्ष वातावरणा पार पडण्यासाठी पोलीस विभागाव्दारे सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटस् किंवा अन्य उपकरणे नेण्यासाठी मनाई करण्यात येईल. निवडणूक साहित्य, मतपेट्या, मतपत्रिका आदी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रात रवाना करण्यात येणार, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक श्री. रेड्डी यांनी बैठकीत दिली.

 

 

ते पुढे म्हणाले की, मतदार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागासाठी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. निवडणुकीचे मतदान पथक मतदान केंद्रांवर पोहोचल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशानुसार मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरामध्ये सार्वजनिक किंवा खाजगी जागेत ध्वनीवर्धक, लाऊडस्पीकर किंवा अन्य उपकरणाचा वापर करण्यास, ते लावण्यास किंवा चालविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात त्यांचे बूथ किंवा मंडप उभारता येणार नाहीत. तसेच बेकायदेशीर जमाव करणे, प्रचार करणे, किंवा मतदारांना आमिष दाखवून प्रभावित करण्यावर बंदी असेल. अनधिकृतपणे मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात वाहने आणण्यास मनाई आहे. तसेच या परिघात असणारी सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, झेरॉक्स, फॅक्स आणि एस.टी.डी. बूथ या कालावधीत बंद राहतील. मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, वायरलेस सेट, कॉर्डलेस फोन, आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि इतर व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा