सेवा संकल्प अभियानांतर्गत अंतर्गत तक्रार समिती सदस्यांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

 सेवा संकल्प अभियानांतर्गत  अंतर्गत तक्रार समिती  सदस्यांसाठी शुक्रवारी कार्यशाळा


अकोला, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने राज्यभरात दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर  या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या वतीने दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ या विषयावर विशेष  जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, भयमुक्त व सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणे आणि संबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यशाळेस अकोला तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेदरम्यान पॉश कायदा, २०१३ मधील महत्त्वपूर्ण कायदेशीर तरतुदी, अंतर्गत तक्रार समितीची रचना व कार्ये, समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची जबाबदारी, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, तक्रारींची चौकशी व निवारण, तसेच महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसंदर्भातील विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांप्रति आदराची भावना निर्माण होणे, लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध बसणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम होणे या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा