अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज ; अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया काळजीपूर्वक व अचूकपणे यशस्वी करावी - विभागीय आयुक्त नयना गुंडे
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया काळजीपूर्वक व अचूकपणे यशस्वी करावी - विभागीय आयुक्त नयना गुंडे
अमरावती दि. २६ - विधान परिषदेसाठी होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक,अचूक व शांततेत यशस्वी करावी,असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी दिले.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवनात होणार आहे. या अनुषंगाने लोकशाही भवन येथील मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक अभय महाजन, विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती गुंडे म्हणाल्या, मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्र सज्ज करण्यात आले आहे. मतमोजणी अधिकारी- कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन, मदत देण्यात येईल. मतपत्रिका वैध- अवैध बाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरित्या पध्दतीने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देऊन निकाली काढावेत. मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक टेबलवरील पथकाने काळजीपूर्वक आणि अचूक काम करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे श्रीमती गुंडे यांनी सांगितले.
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या कर्तव्य आणि कामकाजाची माहिती देत आढावा यावेळी सादर केला. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी आवश्यक नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा यावेळी प्रत्यक्ष टेबलवर सराव करण्यात आला.
सहआयुक्त वासंती माळी यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांऱ्यांना मतमोजणीशी संबंधित बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. मत मोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या शंकांचे अपर आयुक्त संजय जाधव व नरेंद्र फुलझेले यांनी निरसन केले.
यावेळी मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार, वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मतपेट्या उघडणे, मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, भरायचे विविध नमुने, मतपत्रिका वैध,अवैध अचूक वर्गीकरण करणे, प्रत्येक फेरीनुसार निकाल नमुना जमा करणे आदींसह मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुविधा व नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली.
शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी एकुण १४ टेबल असणार आहेत. यासाठी एकाच कक्षात प्रत्येकी १४ टेबलच्या रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीच्या निरीक्षणासाठी नियुक्त उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. उद्या सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रीया सुरू होणार आहे.
०००००

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा