सेवा संकल्प अभियानांतर्गत बाल संरक्षण यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा
या कार्यशाळेत बालगृह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन आणि सखी वन स्टॉप सेंटर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेचे उद्घाटन बाल न्याय मंडळ, अकोला येथील अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती रोशनी बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल कल्याण समिती, अकोला यांच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. लक्ष्मण हगवणे यांनी केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य लोक अभिरक्षक ॲड. नितेंद्र उंबरकर, डॉ. प्रदीप अवचार आणि बाल कल्याण समितीच्या सदस्या श्रीमती प्रांजली जैस्वाल यांनी मार्गदर्शन केले.
बाल संरक्षणाच्या विविध विषयांवर मार्गदर्शन
या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO Act), बालकांशी सुसंवाद साधण्याची प्रभावी पद्धत, समुपदेशन प्रक्रिया, बालगृहातील दैनंदिन दिनचर्या तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांशी संवाद साधताना संवेदनशीलता, संयम आणि बालकांच्या भावनिक गरजांची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन त्यांना योग्य संरक्षण, समुपदेशन आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, यावर भर देण्यात आला.
बाल संरक्षण यंत्रणेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, तसेच बालकांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना सुरक्षित व पोषक वातावरण उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शरयू तळेगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. राजू लाडुलकर यांनी केले.
महिला व बाल विकास विभाग, अकोला यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेमुळे बाल संरक्षण यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यांची जाणीव अधिक दृढ करण्यास आणि बालकांच्या सर्वोत्तम हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास निश्चितच मदत होणार आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा